दहावी, बारावी पुरवणी परीक्षेची तयारी सुरू; कोरोनामुळे विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता

संदीप लांडगे
Thursday, 29 October 2020

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे या प्रक्रियेला विद्यार्थांकडून फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद  : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे या प्रक्रियेला विद्यार्थांकडून फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटण्याची शक्यता आहे. तर मंडळाने शाळा, कॉलेज बंद आणि प्रक्रियेला कमी कालावधी मिळाल्याने पुरवणी परीक्षेसाठीचे केंद्र मागील वर्षीचेच केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली.

Corona Update : औरंगाबादेत १३३ जण कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ३७ हजारांपुढे

माध्यमिक शिक्षण मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षेचे नियोजन केले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबरपासून सुरू आहे. त्यानुसार २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत; परंतु अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस गती नसल्याचे सांगण्यात येते.

अर्ज भरण्यास कालावधी कमी मिळाल्याने आणि शाळा, कॉलेज बंद असल्याने अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरळीत होऊ शकलेली नाही, त्यामुळे अर्जाची संख्या कमी असेल असे शाळा, कॉलेज प्रशासनाला वाटते आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेचा पर्याय शोधावा लागतो. त्यासाठी खर्चाचा भुर्दंड आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. मागील वर्षी १७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान दहावी तर १७ ते चार ऑगस्टदरम्यान बारावीची परीक्षा झाली होती.

बजाजनगरामध्ये घरफोडी, दागिन्यांसह साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

मागील वर्षीचेच केंद्र
शिक्षण मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमधील पुरवणी परीक्षेसाठी जुलै-ऑगस्ट २०१९ मधील परीक्षा केंद्रच निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच केंद्रांना पत्र पाठवीत परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात येणार आहे. त्यावर्षी दहावीसाठी ११० तर बारावीसाठी ४६ परीक्षा केंद्रे होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC, HSC Supplementary Exam Preparation Starts, But Corona Affect Students Number