विकट-एवंच : बहुपदरी कथानक 

photo
photo

औरंगाबाद ; प्राचीन भारतीय साहित्यात पुराणकथा, मिथककथा यांचा एक फार मोठा खजिना आहे. या कथा विलक्षण रोचक तर आहेतच, शिवाय त्यातून मानवी भावभावना, नातेसंबंध, ताणतणाव, मूल्यव्यवस्था, परिस्थिती यांचे मोठे वेधक दर्शनही घडते. त्यातून व्यक्त होणारा आशय आपण वर्तमानकाळाशी, सद्यःस्थितीशीही पडताळून पाहू शकतो. त्यामुळेच या कथा काळातीत स्वरूपाच्या आहेत. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. गिरीश कर्नाड यांनी अशा पुराणकथा, मिथककथा त्यांचे संमिश्रण याद्वारे लिहिलेली नाटके म्हणूनच रंगभूमीच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण कलाकृती ठरली. त्याच जातकुळीशी नाते सांगणारे एक नाटक यंदा राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत आलेय. ते लिहिलेय डॉ. समीर मोने यांनी. त्यासाठी विष्णू पुराण, गणेश पुराण यातून त्यांनी विविध घटक उचलले आणि त्यातून एक देखणे तसेच वर्तमान काळासंदर्भातही विचार करायला लावील असे एक नाटक उभे राहिले. ‘विकट-एवंच’ या नावाचे. 

कथानक बहुपदरी 

नाटकाचे कथानक बहुपदरी आहे. आर्य-अनार्य, रक्ताची-वंशाची शुद्धता, सत्तेतून येणारी मदांधता, जन्माधिष्ठित आणि कर्माधिष्ठित मोठेपणा, संस्कृतीचा संकर, हिंसेचा-हत्यांचा आसुरी आनंद घेण्याची प्रवृत्ती, धर्मसत्ता आणि राजसत्ता यातील संघर्ष, सत्तेचे केंद्रीकरण आणि त्याबाबतचा पीडित प्रजेचा आक्रोश, स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन, सूड आणि प्रतिशोधाची आग, अशा अनेक संदर्भात प्रस्तुत संहिता अभ्यासण्याजोगी, तपासण्याजोगी आहे. 

आभास निर्मीती

नेपथ्यात केवळ लेव्हल्सचा वापर करून सिंहासन, राजसभा, अरण्य, शयनयान अशा विविध स्थळांची प्रकाशयोजना आणि अत्यल्प प्रॉपर्टीचा वापर करून आभास निर्माण केला गेला आहे. विविध दृश्‍यांच्या कोरियोग्राफी म्हणजे पात्रांच्या स्थानांद्वारे दर्शनीय आकृतिबंध निर्माण करणेही बऱ्यापैकी साधलेले आहे. संगीतात प्रामुख्याने मृदंग आणि पारंपरिक तालवाद्यातून हर्ष, रोमांच, रौद्रता, भीती, संकट अशा विविध भावभावनांचा परिपोष होईल, अशी वातावरण निर्मिती केलेली आहे. 

उत्कृष्ट कलावंत

वेशभूषा, रंगभूषा पौराणिक कथा, मिथककथा यांना साजेसी आहे आणि कलावंतही भूमिकांना शोभतील असे भरदार तब्येतीचेच वापरले आहेत. एकूण तंत्राच्या चांगल्या वापरातून नाटकाची दृश्‍यमयता उठावदार केलेली आहे. आशय वा मेसेजच्या बाबतीत मात्र खूपच व्यामिश्र व बहुपदरीत्वामुळे दर्शक बुचकळ्यात पडू शकतो. 

लेखक : डॉ. समीर मोने, दिग्दर्शक : अमर बनसोडे 
नेपथ्य : प्रदीप पाटील, प्रकाश योजना : नीलेश प्रभाकर, संगीत स्वप्नील बोरकर 
रंगभूषा : दत्ता भाटकर, वेशभूषा : सायली तळेकर, कलावंत : श्रीपाद कांबळी, अमर बनसोडे, चेतन किंजळकर, नंदकुमार सावंत, अनंत कदम, जितेंद्र जाधव, सागर माने, कल्याणी पाटील, श्रद्धा कदम, इत्यादी. सादरकर्ते : बृहन्मुंबई पोलिस विभाग, मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com