Online Education : विषय शिकविलाच नाही, म्हणे द्या आता परिक्षा !  

संदीप लांडगे
Thursday, 24 September 2020

पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; ऑनलाइन सराव चाचणी 

औरंगाबाद :  जिल्ह्यातील बहुतांश खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये घटक चाचणी, सराव चाचणी परीक्षा ऑनलाइन सोडवून घेण्याचा धडाकाच सुरू आहे. विद्यार्थ्यांना विषय न शिकवता, त्यांना तो समजला नसताना विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कशी? त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला आहे. शिक्षकांकडून मात्र शिकवले म्हणत परीक्षेचा रेटा लावला जात आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सध्या सुरू होणे अशक्य आहे. पुढेही शाळा कधी सुरू होतील याबाबत शंका आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, शाळा सुरू राहाव्यात, शिक्षकांच्या हाताला काम राहावे, विद्यार्थी अभ्यासात मग्न राहावेत, यासाठी शाळांकडून ऑनलाइन शिक्षण प्रणाली राबवली जात आहे. हा उपक्रम चांगला असला तरी, जिल्ह्यात फक्त २५ ते ३० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात सहभागी होतात. बाकीच्या ७० ते ७५ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल, नेटवर्क यासारख्या तांत्रिक अडचणी आहेत. शाळेच्या शिक्षकांकडून ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू असले तरी, सर्वच विद्यार्थी सहभागी होत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, नेटवर्कची अडचण आहे अशा विद्यार्थ्यांनी सराव चाचणी, घटक चाचणीमध्ये कसे सहभागी व्हावे? गणित, विज्ञानासारख्या काठिण्य पातळीवरील विषयांची ऑनलाइन परीक्षा कशी घेणार? या विषयांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या तरी त्यातील आकृत्या, प्रॅक्टिकल मुलांना कसे समजणार? याबाबत कोणाकडेही ठोस असे उत्तर नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शाळेतील शिक्षकांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना झूम ॲप, गुगल मीट, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवलेले समजले का? सहभागी विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी आहेत का? किती विद्यार्थी उपस्थित आहेत? जे अनुपस्थित आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा तास घेतले का? ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा पालक कामावर जातात त्या विद्यार्थ्यांसाठी काही सोय आहे का? याचे सर्वेक्षण शाळा व शिक्षकांनी करण्याची गरज असताना केवळ नियमानुसार घटक चाचणी किंवा सराव चाचणी होणे आवश्‍यक आहे, म्हणून परीक्षा घेणे कितपत योग्य आहे? असा प्रश्‍न पालक, शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subject is not teaching now give exam