संग्रामनगर भुयारी मार्ग लांबणीवर! 

file photo
file photo

औरंगाबाद : संग्रामनगर येथील भुयारी मार्गाच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या; मात्र प्रत्यक्ष कामासाठी आणलेले अवजड गर्डर हैदराबादला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रेल्वेच्या या नवीन नीतीमुळे भुयारी मार्ग होणार किंवा नाही, होणार असेल तर केव्हा होणार अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

उदघाटनाचा फार्स 

संग्रामनगर येथे भुयारी मार्ग व्हावा, यासाठी या भागातील नागरिकांनी प्रचंड जनआंदोलन उभे केले होते. त्यामुळे नरमलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार गेल्यावर्षी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले होते. 

अवजड गर्डर आणले

 उद्‌घाटनाच्या नंतर वर्ष उलटूनही प्रत्यक्ष काम होत नसल्याने मेट्रो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने निविदा काढल्या. त्यानुसार ठेकेदाराने भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्‍यक अवजड गर्डर आणून ठेवले होते. प्रत्यक्षात हे गर्डर पुन्हा हैदराबादला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

गर्डर हलवण्याच्या हालचाली 

अपेक्षेपेक्षा कमी लांबी व रुंदीचे गर्डर आल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते. भुयारी मार्गासाठी आलेले गर्डर 16 मीटर लांब असून त्यांची रुंदी 25 फूट आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन वेळेस चार तासांचे मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत. अशा कामाला रेल्वे प्रशासन परवानगी देण्यास तयार नाही. त्यातच नियोजित भुयारी मार्गाखाली कडक दगड असल्याने या कामास अधिक वेळ लागण्याची शक्‍यता आहे. म्हणून आता जास्तीचे लांब म्हणजे 21 मीटर लांबीचे व 25 फूट रुंदीचे गर्डर शोधण्याच्या कामाला दक्षिण मध्य रेल्वेने सुरवात केली. असे गर्डर मिळाल्यास चार मेगाब्लॉकऐवजी दोन मेगाब्लॉकमध्ये काम होईल. त्यामुळेच पूर्वी आणून ठेवलेले गर्डर पुन्हा हैदराबादला पाठविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

रेल्वेच्या या निर्णयाला मेट्रो असोसिएशन, औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. 
डिसेंबर महिन्यात मेगाब्लॉक घेऊन कामास सुरवात करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते; मात्र आता रेल्वे वेगळेच नियोजन करीत आहे. सध्या पडून असलेले गर्डर हलविण्याचा प्रयत्न झाल्यास, या भागातील गर्डरपुढे महिला व पुरुष आडवे उभे राहतील. 
श्रीमंत गोर्डे पाटील (अध्यक्ष मेट्रो असोसिएशन)  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com