औरंगाबादला नवा धोका : कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचे रुग्ण घाटीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

एकमेव कोरोनाग्रस्त महिलेचा अहवाल कालच निगेटिव्ह आला असताना, सायंकाळी स्वाईन फ्लूचा धोका दारावर टकटक करत असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या संशयावरून घाटीत उपचारासाठी दाखल झालेल्या दोन जणांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. 

औरंगाबाद : एकमेव कोरोनाग्रस्त महिलेचा अहवाल कालच निगेटिव्ह आला असताना, सायंकाळी स्वाईन फ्लूचा धोका दारावर टकटक करत असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या संशयावरून घाटीत उपचारासाठी दाखल झालेल्या दोन जणांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी लाख खटपटी सुरू असतानाच आता स्वाईन फ्लूचे संकट ओढवल्याने आरोग्य यंत्रणेपुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आल्याचे समाधानही कुणाला पुरेसे घेता आलेले नाही. 

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे. अगदी साध्या ताप आणि खोकल्याच्या रुग्णांनाही विलगीकरण करत वेगळे ठेवले जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या सर्वांचेच स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याच्या आईसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. आता प्राध्यापिकेसह सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. 

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

असे असतानाच यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे. पण हे कोरोना पॉझिटिव्ह नसून ‘स्वाईन फ्लू’ने त्यांच्या शरीरात शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रूग्णांना शासकीय रुग्णालय - घाटीत उपचारासाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. 

आता स्वाईन फ्लू व्हायरसचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. हे दोन जण आता कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swine Flue In Aurangabad After Coronavirus Health Emergency News