जागेच्या वादातून औरंगाबादेत दोन गटांत तलवारींनी धुमश्‍चक्री, दोन महिलांसह आठ जखमी

3crime_201_163
3crime_201_163

औरंगाबाद : गत काही काळापासून शांत असलेल्या औरंगाबाद शहरात जागेच्या वादातून काही लोकांचे गट एकमेकांवर चालून गेले, तलवारी आणि लाठ्याकाठ्यांनी धुमश्चक्री झाल्याने रविवार बाजार येथे एकच धावपळ उडाली. या गंभीर घटनेत दोन महिलांसह आठजण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोचला तसेच पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनीही धाव घेत पाहणी केली. हा प्रकार रविवारी (ता.२७) दुपारी चार वाजता घडला.  


पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मुश्ताक बिल्डर, त्याचा भाऊ मुमताज राजा, सय्यद मोसीन, सय्यद अथर, सय्यद गफूर, शहेबाज कदीर खान, शकिला बेगम कदीर खान यांच्यासह एक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. जुना मोंढ्यातील जाफर गेटजवळ खादर आवलिया दर्ग्याची आठ एकर जागा आहे. या जागेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. फिर्यादी सय्यद नबीद पाशा सय्यद खाजा पाशा (२९, रा. दर्गा कंपाऊंड, जाफरगेट) यांचे आजोबा सय्यद कादर पाशा हे दर्ग्याचे मुतवल्ली आहेत. त्यामुळे ते दर्गा भागातच राहतात.

या दर्ग्याच्या जागेवरून मुश्ताक बिल्डर (रा. नवाबपुरा) याच्याशी त्यांचा वाद सुरू आहे. मुश्ताक हा त्यांना त्याचा भाऊ मुमताज राजा हा दर्ग्याचा मुतवल्ली असल्याचे सांगत असून तुम्ही ही जागा खाली करा, असे धमकावत आहे; परंतु सय्यद नबीद पाशा हा वंशपरंपरेने दर्ग्याची देखभाल आम्हीच करतो. त्यामुळे या जागेवर आमचाच दावा आहे, असे सांगतो. त्यांचा हा वाद न्यायप्रविष्ट आहे. २७ सप्टेंबरला दुपारी चार वाजता नबीद पाशा याची काकू आशू बेगम घरी असताना मुश्ताक बिल्डर हा दीडशे लोकांचा जमाव घेऊन दर्गा परिसरात गेला.

त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आणि तलवारी होत्या. हा प्रकार आशू बेगम हिने नबीदला सांगितला. तो जवळच असल्याने घरी पोचला. त्यानंतर मुश्ताक बिल्डरच्या लोकांनी शिवीगाळ करून दगडफेक केली. हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. तेथे पोलिस आल्यानंतर प्रकरण तात्पुरते शांत झाले. या प्रकरणात विनोद खेमजी आणि मुश्ताक बिल्डर यांनी परस्परविरोधी तक्रारी केल्या. त्यानुसार, तलवारी आणि लाठ्याकाठ्याने एकमेकांवर हल्ला झाला. अचानक हल्ला झाल्याने काही जण तेथून तेथून पसार झाले. मात्र, दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवून हल्ला केला. यात दोन महिलांसह आठजण जखमी झाले.

पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक
मोंढ्यात धुमश्चक्रीनंतर क्रांती चौक व जिन्सी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. दोन्ही गटांना समजावून सांगत असताना मुश्ताक बिल्डरच्या गटाने पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केली. दरम्यान, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी धाव घेतली; तसेच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, अमोल देवकर, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, विजय पवार हेही तेथे होते. आयुक्तांनी काही स्थानिकांशी चर्चा केली तसेच पोलिसांना सूचनाही दिल्या. या सर्व प्रकरणात विविध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com