औरंगाबाद शहरात वाढवणार दहा टक्के बेड, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती

माधव इतबारे
Thursday, 19 November 2020

कोरोना संसर्ग औरंगाबाद शहरात कमी होत असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी २०२१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीत दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आदेश शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

औरंगाबाद : कोरोना संसर्ग शहरात कमी होत असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी २०२१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीत दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आदेश शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने तयारी सुरू केली असून, ज्या काळात शहरात सर्वाधिक रुग्ण सक्रिय होते, तो आकडा गृहीत धरून दहा टक्के बेड वाढविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी बुधवारी (ता. १८) सांगितले.

 

कोरोना संसर्गाची जानेवारी, फेब्रुवारीत दुसरी लाट येण्याची शक्यता असून, त्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे आदेश आरोग्य विभागाच्या संचालकांनी काढले आहेत. त्यात दर दहा लाख लोकसंख्येमागे १४० जणांच्या चाचण्या झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात यावे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणानुसार अतिजोखमीच्या व्यक्तींची वारंवार तपासणी करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात श्रीमती पाडळकर यांनी सांगितले की, जास्तीत जास्त चाचण्या होतील यासाठी लॅबची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

घाटी रुग्णालयात दर दिवशी एक हजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ४०० तर आठ खासगी लॅबमध्ये चाचण्या केल्या जातात. सुमारे तीन हजार चाचण्या होतील, अशी व्यवस्था आहे. तसेच दहा लाख लोकसंख्येमागे १४० चाचण्या करण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, दिवाळीचा काळ वगळता शहरात सरासरी एक हजार चाचण्या होत आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील सुमारे २० जणांवर लक्ष ठेवले जात आहे. आठवडी बाजारात चाचण्या केल्या जात असल्याचे पाडळकर यांनी नमूद केले.

चालक-वाहकांच्या तपासण्या
जनसंपर्क अधिक असलेले किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल मालक व वेटर्स, दूधविक्रेते, मोलकरणी, गॅस सिलिंडर वाटप करणारे, इलेक्ट्रिकची कामे करणारे, नळ जोडणी करणारे, लॉन्ड्रीवाले, पुरोहित, मालवाहतूक करणारे ट्रकचालक, टेंपोचालक, रिक्षाचालक, मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक-वाहक, पोलिस, होमगार्ड यांच्यासह इतरांच्या चाचण्या करण्याचे आदेशात नमूद आहे. त्यानुसार स्मार्ट शहर बसचे चालक-वाहक, एसटी महामंडळाचे ४०० चालक-वाहक यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत, असे श्रीमती पाडळकर यांनी नमूद केले.

 

Edited - Ganesh Pitekar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Percent Beds Will Increase, Corona's Second Wave Fear In Aurangabad