टीईटी परिक्षेला 1 हजार 441 भावी शिक्षकांची दांडी

टीईटी परिक्षेला 1 हजार 441 भावी शिक्षकांची दांडी

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता. 19) झाली. 56 केंद्रांवर एकूण 18 हजार 85 विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर काही जण उशिरा पोचल्याने काही ठिकाणी बाचाबाची झाली. दोन सत्रांत झालेल्या या परीक्षेला एक हजार 441 परीक्षार्थींनी दांडी मारली. 

पवित्र पोर्टलद्वारे भरती होऊन नोकरी मिळेल या आशेने भावी शिक्षकांनी तर 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेले आणि 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांनी सेवा समाप्तीची कार्यवाही टाळण्यासाठी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. शहरातील 56 केंद्रांवर 18 हजार 85 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेला किती वाजता यावे, येताना मोबाईल, लॅपटॉप, कॅल्क्‍युलेटर, डिजिटल डायरी, कॅमेरा असे इलेक्‍ट्रॉनिक साहित्य आणू नये. तसेच येताना फक्त ओळखपत्र व प्रवेश पत्र घेऊन यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

दोन सत्रांमध्ये झालेल्या पहिल्या पेपरसाठी 32 केंद्रांवर 10 हजार 329 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली. यातील नऊ हजार 546 जणांनी परीक्षा दिली, तर 783 गैरहजर होते. 24 केंद्रांवर झालेल्या पेपर दोनसाठी नोंदणी केलेल्या सात हजार 758 पैकी सात हजार 100 जणांनी परीक्षा दिली, 658 जणांनी दांडी मारली. दोन्ही पेपरमध्ये एक हजार 441 परीक्षार्थी गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली. 

मोबाईलमुळे गोंधळ 

अनेक केंद्रांवर परीक्षार्थी उशिरा पोचले. काहींनी मोबाईल सोबत आणले होते. केंद्रप्रमुखांनी या सर्वांनाच रोखल्यानंतर काही केंद्रांवर गोंधळ झाला. एका केंद्रातील इमारतीत प्रवेश करण्यासाठी दोन गेट असल्याने परीक्षार्थी गोंधळले. नियोजित केंद्रात प्रवेशासाठी दुसऱ्या गेटने वापर केल्याने त्यांना रोखण्यात आले.

आसन व्यवस्था असलेल्या केंद्राच्या गेटपर्यंत जाण्यास विलंब झाल्याने त्यांना रोखण्यात आल्याने परीक्षार्थींनी वाद घातला. शेवटी नियमांकडे बोट दाखविल्यानंतर परीक्षार्थींना नरमते घ्यावे लागले. असे असले तरीही त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन परीक्षा देण्यास मुभा देण्यात आली. दरम्यान, बालमानसशास्त्र हा पेपर अवघड गेल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. 

चिमुकल्यांना सांभाळले बाबांनी 

परीक्षा देणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. काही जणी पती, मुलांना घेऊन परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. दोन सत्रामध्ये झालेल्या परीक्षा कालावधीत चिमुकल्यांना सांभाळण्याची जबाबदारी बाबांवर आली होती. इतरत्र जाण्याऐवजी केंद्र परिसरातील ओटे, झाडाखाली मुलांना घेऊन बाबा बसले होते. चिमुकल्यांना भूक लागल्यावर बॉटलमध्ये दूध पाजणे, रडल्यास शांत करण्याची जबाबदारी बाबांना निभवावी लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com