ऑक्सिजन बेडही औरंगाबादेत मिळेना, रुग्णांची प्रतिक्षा संपता संपेना

मनोज साखरे
Sunday, 13 September 2020

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यायाने मॉडरेट रुग्णांची संख्याही लक्षणीय वाढत आहे. अशा रुग्णांना कधीही ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे ऑक्सिजन बेडची निकड अधिक भासत असून, दोन महिन्यांत ४५ टक्के ॲक्टिव्ह रुग्ण वाढले असून, सध्या खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यायाने मॉडरेट रुग्णांची संख्याही लक्षणीय वाढत आहे. अशा रुग्णांना कधीही ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे ऑक्सिजन बेडची निकड अधिक भासत असून, दोन महिन्यांत ४५ टक्के ॲक्टिव्ह रुग्ण वाढले असून, सध्या खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. घाटी रुग्णालयात ऑक्सिजन वॉर्ड वाढविल्यानंतरही तिथे वेटिंग करावी लागल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ११) घडला.

त्यामुळे आता ऑक्सिजन बेडही आयसीयूवर असून, भविष्यात आणखी गरज तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात रुग्णांना वेळेत योग्य उपचार सुविधा उपलब्ध होणे अत्यावश्‍यक आहे; पण सद्यःस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यादृष्टीने शासकीय रुग्णालयांसह सर्व खासगी रुग्णालयांनी जास्त संख्येने बेड व उपचार सुविधांत वाढ करण्याचे निर्देश प्रशासनाचे आहेत.

शासनाने कान उपटताच प्रशासकांना जाग, औरंगाबाद महापालिकेत ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती

घाटीत ४००, जिल्हा रुग्णालयात ३००, धूत रुग्णालयात १५०, हेडगेवार रुग्णालयात २००, बजाज रुग्णालयात १०० व एमजीएमने ५५० पर्यंत असे एकूण सतराशे बेड वाढविण्याचे लक्ष्य आहे. अर्थात सतराशे बेड वाढविताना यात आयसीयू, ऑक्सिजन बेड किती हे स्पष्ट नसून सध्याच्या स्थितीसोबतच भविष्यातही अजून बेडची आवश्‍यकता आहे. खासगी रुग्णालयात मॉडरेट रुग्णांना बेडसाठी वेटिंग असल्याची बाब समोर आली आहे.

दृष्टिक्षेप
-एकूण रुग्णांपैकी (२७७१२) ७० टक्के रुग्ण केवळ ११ जुलै ते ११ सप्टेंबर या कालावधीत वाढले.
-ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ जुलैला तीन हजार ९६ होती. ११ सप्टेंबरपर्यंत संख्या पाच हजार ७१० वर गेली.
-११ जुलै ते ११ सप्टेंबर या दोन महिन्यांत जादा दोन हजार ६१४ रुग्ण.
-म्हणजेच जुलैच्या तुलनेत आता तेवढेच अर्थात दोन हजार ६१४ बेडची गरज वाढली.
-भविष्यात ही गरज पाच ते सहा हजारांनी वाढू शकते.
-जुलैच्या तुलनेत सध्या ४५.७७ टक्के ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली.

औरंगाबादेत व्यापारी, नागरिकांनी केले 'खड्ड्यांचे पूजन'  

म्हणून हवे बेड
असिम्थेमॅटिक व माईल्ड रुग्णांसाठी कोविड केअर आहेत; पण जशी संसर्गाची व्याप्ती वाढतेय तशी मॉडरेट रुग्णांची संख्या वाढतीच आहे. त्यांना कधीही ऑक्सिजनची गरज भासेल याचा नेम नाही. अशा रुग्णांना सुविधा असलेल्या रुग्णालयातच उपचाराची गरज भासते. त्यामुळे ऑक्सिजन बेडची गरज आहे. बाधितांचे वाढते प्रमाण, संसर्गाची व्याप्ती व ॲक्टिव्ह रुग्णांची वाढत्या टक्केवारीमुळे आता बेडची गरज वाढली आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Beds For ICU Patients Aurangabad News