कोरोना रुग्ण घटले पण उपचार केंद्र राहणार सुरूच, दिवाळीनंतरची तयारी

माधव इतबारे
Thursday, 12 November 2020

कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत असला तरी दिवाळीनिमित्त बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता येत्या काळात पुन्हा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे रुग्ण वाढले तर ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सर्व कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत असला तरी दिवाळीनिमित्त बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता येत्या काळात पुन्हा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे रुग्ण वाढले तर ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सर्व कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील नागरिक गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाच्या सावटाखाली होते. आता शासनाच्या परवानगीने बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. बाजारपेठा खुल्या करताना सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ६७१ कोरोनाबाधितांवर उपचार, नवे १२६ रूग्ण

मात्र सध्याचे चित्र नेमके उलटे आहे. गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट, शहागंज, टीव्ही सेंटर यासह इतर ठिकाणी दिवाळीच्या खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. त्यात नागरिक ना मास्कचा वापर करत आहेत ना सुरक्षित अंतराचा नियम पाळत आहेत. महापालिकेने मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यालाही नागरिक जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

या गर्दीत एक जरी पॉझिटिव्ह रुग्ण फिरला तर तो सरासरी चारशे जणांना धोक्यात आणू शकतो. येत्या पंधरा दिवसानंतर सध्‍या होणाऱ्या गर्दीचे परिणाम दिसून येतील, असा अंदाज महापालिकेतील आरोग्य विभागाने वर्तविला जात आहे. दरम्यान सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटल्याने अनेक कोविड केअर सेंटर बंद आहेत. मात्र नोव्हेंबर अखेरीस आढावा घेऊन काही कोरोना उपचार केंद्र बंद करण्याचा विचार केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू

परिस्थिती पथकांच्या आवाक्याबाहेर

मास्क न वापरता रस्‍त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड लावला जात आहे. त्यासाठी प्रशासनाने नागरिक मित्रांचे १५ पथक नेमले आहेत. सुरुवातीला पथकाकडून दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. मात्र सध्याची गर्दी व मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण पाहता, किती लोकांना दंड लावणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment Centers Continue Open In Aurangabad