सहा लाख ७६ हजार जनावरांच्या लसीकरणासाठी २५ लाखांचा निधी मिळणार

दुर्गादास रणनवरे
Wednesday, 23 September 2020

पशुसंवर्धन विभागाला प्राप्त आर्थिक तरतुद आधीच तोकडी आहे. आता फक्त ३३ टक्केच प्रत्यक्ष तरतुद उपलब्ध आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील गाय वर्गीय जनावरांमध्ये पसरणाऱ्या लंपी स्कीन रोगावर नियंत्रणासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ६ लाख ७६ हजार जनावरांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून औषधी व लसीकरणासाठी २५ लाख रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समितीचे सभापती एल.जी.गायकवाड यांनी केली होती.

या मागणीची तात्काळ दाखल घेत श्री.सत्तार यांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत श्री.गायकवाड यांनी दिली. जनावरांवरील लंपी रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा, असे निर्देश श्री.सत्तार यांनी प्रशासनाला बैठकीत दिले व स्वतःच्या आमदार निधीतून लंपी स्किन रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पाच लाखांचा निधी देण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी देखील जनावरांवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकी पाच लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शंभर टक्के उपस्थितीला अधिकारी महासंघाचा तीव्र विरोध !

खरेदीसाठी १०० टक्के तरतुदीची मागणी
पशुसंवर्धन विभागाला प्राप्त आर्थिक तरतुद आधीच तोकडी आहे. आता फक्त ३३ टक्केच प्रत्यक्ष तरतुद उपलब्ध आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागासाठी औषध व सर खरेदीसाठी असलेली १०० टक्के तरतुद उपलब्ध करुन द्यावी, तातडीने औषधी व लस खरेदीसाठी किमान २५ लाख एवढी तरतुद जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करावी, अशी मागणी श्री.गायकवाड यांनी बैठकीत प्रशासनानाकडे केली.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी राज्यस्तरावर व जिल्हा परिषद स्तरावरील पशुसवंधर्न यंत्रणांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लंपी स्किन आजाराने बाधित जनावारांचे सर्वेक्षण करुन उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष मीना शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, डॉ.सुरेखा माने तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Five Lakh To Be Allotted For Vaccination