बेरोजगार तरुणांचा डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षक दिनी होणार भक्षक दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 3 September 2020

शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक "डिग्री जलाओ आंदोलन" करून "शिक्षक दिन हा भक्षक दिन" म्हणून साजरा करणार आहेत. 

औरंगाबाद : येत्या ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पात्रताधारक बेरोजगार युवक-युवती आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि यापूर्वी शासनदरबारी वारंवार पत्रव्यवहार करुनही कोणत्याही स्वरूपाची सकारात्मक कार्यवाही केली गेली नसल्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक "डिग्री जलाओ आंदोलन" करून "शिक्षक दिन हा भक्षक दिन" म्हणून साजरा करणार आहेत. 

या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व विद्याशाखेतील  पदविका, पदवी, पदव्युत्तर, डी.टी.एड, बी.एड., बी.पी.एड, एम.एड., एम.पी.एड., एम.फिल.,नेट, सेट आणि पीएचडी पात्रताधारक बेरोजगार यांच्या सर्व संघटना आणि अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (कनिष्ठ व वरिष्ठ) महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तासिका, कंत्राटी, अतिथी सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन यासह जवळपास ३०-३२ संघटना मिळून ही कृती संपुर्ण महाराष्ट्रात शांततेत (मुकपणे), कोविड-१९ महामारी संदर्भातील शासनाने वेळोवेळी काढलेले सर्व आदेशांचे पालन करून आंदोलन करणार आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय, अनेकांनी सुरु केले काम

सदर आंदोलन दोन प्रकारे होणार आहे ते, 1. पोलिस आयुक्त व अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ आणि सहसंचालक कार्यालय आदी परिसरात परवानगी मिळालेल्या ठिकाणी (१० -५० लोक) सामूहिक डिग्री जलावो आंदोलन करतील., 2 ज्या परिसरात परवानगी मिळाली नाही अशा परिसरात आपापल्या घरी डिग्री ज्वलन करून त्याचे छायाचित्र / व्हिडिओ तयार करून स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून व्हायरल करून या आंदोलनात सहभागी होऊन आपला रोष किंवा निषेध व्यक्त करणार आहोत. दोन्हीही पद्धतीने डिग्री जलाओ आंदोलन करत असताना कोवीड  या महामारीच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी काढलेल्या शासन नियमांचे पालन करूनच सर्व उच्च शिक्षित बेरोजगार सामील होणार आहेत.

राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलनासाठी सर्वस्तरावर पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे त्याचे उत्तरे लवकरच मिळतील, त्याबाबत संपूर्ण आढावा बैठक शुक्रवारी (ता.चार)  घेऊन आंदोलनाचा कृती कार्यक्रम व सविस्तर माहिती दिली जाईल. या निवेदनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील आपण आणि आपल्या परिसरातील उच्च शिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी यात सामील व्हावे आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी खारीचा वाटा उचलून इतिहासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन संघटनांतर्फे करण्यात आली, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

(संपादन- गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployed Youths Will Organise Degree Jalao Andolan Aurangabad News