बसने केला प्रवास अन् प्रवाशांची तिकीटे ही काढली

शेखलाल शेख
Thursday, 20 August 2020

वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी या निर्णायाचे स्वागत करत सिडको बसस्थानक ते फुलंब्री असा बस प्रवास केला. एवढेच नाही तर तर या बसने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचे तिकीट काढले. पदाधिकाऱ्यांनी गाडीचे चालक संतोष पंडीत व कंडक्टर आदिनाथ गाकवाड यांचा सत्कार केला. 

औरंगाबादः लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटात एसटीची चाके थांबली होती. गुरुवारपासून राज्यात एसटी बस सेवा सुरु झाली. सार्वजनिक वाहतुक सेवा सुरु करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यात डफली बजाओ आंदोलन केले होते. आता बस सेवा सुरु झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी या निर्णायाचे स्वागत करत सिडको बसस्थानक ते फुलंब्री असा बस प्रवास केला. एवढेच नाही तर तर या बसने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचे तिकीट काढले. पदाधिकाऱ्यांनी गाडीचे चालक संतोष पंडीत व कंडक्टर आदिनाथ गाकवाड यांचा सत्कार केला. 

राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी दुकाने, उद्योग, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा सुरू करा, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचिततर्फे राज्यभरात डफली बजाव आंदोलन सुरू केले होते. आता टप्याटप्याने राज्यातील दुकाने, मॉल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. काल राज्य सरकारने परिवहन मंडळाच्या बसेस सुरू करण्याची घोषणा केली.

हेही वाचा- औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात डाॅक्टर-नर्सला मारहाण

त्यानंतर गुरुवार (ता.२०) वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ व इतर कार्यकर्त्यांनी सिडको बसस्थानकातून औरंगाबाद ते फुलंब्री असा बस प्रवास केला. या दरम्यान गाडीत गिटार वाजवत गाणे म्हणत वंचितने या निर्णयाचे स्वागत केले. तसेच सहप्रवाशांना ते जातील तिथपर्यंतची तिकीटे देखील काढून दिली. 

राज्यातील सलून व्यवसायिक, छोटे मोठे टपरी, दुकानचालक, कामगार यांच्यावर आलेली उपसमारीची वेळ पाहता या सर्वांना आता लॉकडाऊनच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीच आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नागरिकांनी आता पुर्वीप्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार सुरु करावे असे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी राज्यप्रवक्ता अमित भुईगळ, पश्‍चिम शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, पुर्व शहराध्यक्ष डॉ. जमील देशमुख, अनिल जाधव, मनोज वाहुळ, नितीन मोने, दत्ता सुत्रावे, सचिन मिसाळ, राज आव्हाड, कपिल बनकर, विशाल सोनावणे, निकलेश कांबळे, स्वप्नील गायकवाड, धनंजय भावले, नितीन साळवे, गुड्डु वाहुळस काकासाहेब जाधव यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi Member Travelling St Bus In Aurangabad