विक्रम गोखलेंचा दिलदारपणा ज्येष्ठ कलावंतासाठी... 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीची एक एकराची जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावाने करुन द्यायचा निर्णय घेतला आहे. बाजार भावानुसार या जागेची किंमत जवळपास अडिच कोटी रुपये आहे. या जागेवर ज्येष्ठ व एकटे राहाणाऱ्या कलावंतांना आसरा हक्काचा मोफत निवारा मिळणार आहे. 

काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे विक्रम गोखलेंचे वडील. चंद्रकांत गोखले दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देत असत. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनी त्यांचा हाच वारसा पुढे चालू ठेवला असून दरवर्षी त्यांनीही हे मदतकार्य चालूच ठेवले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कंपन्या, उद्योग, व्यावसायांना मोठा फटका बसला आहे.

यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रम गोखले यांनी स्वतः मदत तर केली आहेच, परंतु बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

विक्रम गोखले यांनी उतारवयात ज्येष्ठांची होणारी फरफट पाहिली आहे. त्यांनी नटसम्राट, एबी आणि सीडी, अनुमती यासारख्या चित्रपटातून ज्येष्ठांची होणारी परवड अनुभवली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे.

आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि हक्काचा निवारा मिळणार आहे. सदर जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आश्रम उभा करण्याचे ठरवले आहे. तसेच या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com