मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी ‘वंचित’कडून नागोराव पांचाळ यांना उमेदवारी जाहीर

ई सकाळ टीम
Wednesday, 11 November 2020

विधानपरिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा.नागोराव काशिनाथ पांचाळ यांना आज बुधवारी (ता.११) उमेदवारी जाहीर झाली आहे.

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा.नागोराव काशिनाथ पांचाळ यांना आज बुधवारी (ता.११) उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या एक डिसेंबर रोजी पदवीधर निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पांचाळ यांच्या उमेदवारी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

एमआयएमने काढली औरंगाबादेत रॅली, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश

जयसिंगराव गायकवाड यांचा पदवीधरमध्ये अर्ज दाखल
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, यानंतर भाजपचे पदाधिकारी तथा माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता. दहा) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  भाजपकडून जयसिंगराव गायकवाड, किशोर शितोळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र बोराळकर यांच्या नावाची घोषणा झाली. लोकसभा निवडणुकीवेळीही माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता मात्र ऐनवेळी युती झाली. त्यावेळीही श्री. गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. जयसिंगराव गायकवाड यांनी यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

मृत्युदराची पुन्हा उसळी, औरंगाबादेत दोन लाख ६४ हजार कोरोना चाचण्या निगेटिव्ह

सहा जणांचे अर्ज
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी जयसिंगराव गायकवाड यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची गुरूवार (ता. १२) शेवटची तारीख आहे. मंगळवारी (ता. दहा ) जयसिंगराव गायकवाड, अशिष देशमुख, प्रविणकुमार पोटभरे, भारत फुलारे, अॅड. यशवंत कसबे व शिरीष बोराळकर यांनी अर्ज भरले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wanchit Bahujan Aghadi Declare Nagorao Panchal Candidate For Aurangabad Graduate Constituency Election