EXCLUSIVE : थेट कोरोना बाधितांच्या वॉर्डातून, असा आहे रुग्णांचा दिनक्रम

विकास देशमुख
Sunday, 12 April 2020

  • सकाळी साडेपाचला योगा
  • नऊला नाश्ता, बाराला जेवण 
  • औरंगाबाद शहरातील सर्व रुग्ण तणावमुक्त
  • मिनी घाटीत उपचार 

औरंगाबाद  : कोरोना आणि त्यापासून होणाऱ्या कोवीड-१९ ने संपूर्ण जग तणावात आहे; पण आरोग्य विभाग घेत असलेल्या योग्य काळजीमुळे औरंगाबाद शहरात उपचार सुरू असलेले बाधित रुग्ण तणावमुक्त आहेत. सकाळी साडेपाचला अंघोळ, व्यायाम, योगा, नऊला नश्ता-चहा, दुपारी बाराला जेवण, दुपारी मोबाईलवर मनोरंजन आणि वाचन, रात्री सात वाजता जेवण आणि दहाला झोप असा दिनक्रम आहे, अशी माहिती कोरोना बाधित असलेल्या डॉक्टरने ‘सकाळ’ला दिली. 

शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोना बाधित झाले. सध्या त्यांच्यासह इतर बाधितांवर चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्त डॉक्टर म्हणाले, ‘‘माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला मिनीत घाटीत शिफ्ट केले. या ठिकाणी सुविधा मिळतील की नाही, अशी शंका सुरवातीला होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरला; पण जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी समुपदेशन करून याच ठिकाणी उपचार घ्यावे, असा सल्ला दिला. त्यांचे ऐकले. आता येथे केवळ माझीच नव्हे तर सर्वच बाधित रुग्णांची आणि आम्हा बाधितपासून इतर कुणी बाधित होऊ नये, यासाठी आमची कुठलीही गैरसोय होऊ न देता योग्य ती काळजी घेतली जात आहे. तपासणीसाठी रोज जे डॉक्टर्स, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी, जेवण देणारे येतात त्या सगळ्यांकडे पीपीई कीट आहे. 

हे वाचलं का? - Covid 19 : कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?

प्रकृती उत्तम 

सुरवातीपासून माझ्यात कोरोनाचे कुठलीच लक्षणे दिसली नाहीत. प्रकृती उत्तम आहे. हा सुधार पाहता दोन दिवसांपासून मला सुरू असलेला औषध उपाचही बंद करण्यात आला. आता या पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह आला की कोरोनामुक्त म्हणून माझी सुटी होऊ शकते, असा विश्वासही बाधित डॉक्टरांनी व्यक्त केला. शिवाय वॉर्डातील इतर रुग्णांचीही प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. 

Image may contain: bedroom and indoor
जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका कोरोनाग्रस्ताचा कक्ष

असा आहे बाधितांचा वॉर्ड 

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय खास कोरोनाग्रस्तांसाठी राखीव आहे. सुसज्ज इमारत असलेल्या या रुग्णालयात खास बाधितांसाठी वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. सध्या येथे १६ बाधितांवर उपाचार सुरू आहेत. येथे प्रत्येक रुग्णाला आठ बाय दहाचा स्वतंत्र कक्ष दिला आहे. या कक्षात खेळती हवा आहे. कक्षाची वेळोवेळी स्वच्छता केली जाते. बाधितांना एकमेकांशी सोशल डिन्सस्ट पाळून बोलण्याची मुभाही आहे. 

हो खरंच - भयंकर! कुत्रा, मांजर, चिमणीलाही कोरोना, आता मनुष्याचे काय? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Is Happening In Corona Patient Ward Aurangabad News