अब्दुल सत्तारांच्या "ना'राजीनाम्याची ही आहेत कारणे, वाचा...

aurangabad
aurangabad

औरंगाबाद - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारनंतर खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना बंडखोरी करायला लावून शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न फसल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला असला तरी या राजीनाम्यामागे मंत्रिमंडळात मिळालेले दुय्यम स्थान हेच कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच धुमधडाक्‍यात पार पडला. त्यानंतर लगेच मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यात शनिवारी सकाळीच शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत ठाकरे यांच्यापुढील अडचणीत आणखी वाढ केली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शुक्रवारी (ता. तीन) झालेला वाद यामागचे कारण असल्याचे वरवर सांगितले जात असले तरी मंत्रिमंडळात कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आल्याने सत्तार नाराज होते. त्यांनी अध्यक्षपदाच्या वादाचे निमित्त करत राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती, तशी इच्छा आणि दावा देखील सत्तार यांनी वारंवार केला होता. सत्तार यांनी आपल्याला उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पद देण्याचा शब्द दिला होता असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा अनपेक्षितपणे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली तर ज्या सत्तार यांची बोळवण राज्यमंत्रिपद देऊन करण्यात आली. तेव्हापासूनच सत्तार यांच्या मनात चलबिचल सुरू होती. 

भाजपने लावली फूस! 
जिल्हा परिषद निवडणुकीचेनिमित्ताने सत्तार यांनी शिवसेनेलाच दणका देण्याचा प्रयत्न केला. आपल्या समर्थक कॉंग्रेस सदस्यांचा स्वतंत्र गट करत भाजपच्या मदतीने शिवसेनेच्याच डोणगावकर यांना रसद पुरवून अध्यक्ष करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भाजपने देखील या संधीचे सोने करत शिवसेनेला धडा शिकवण्याची संधी हेरली. मात्र गोंधळामुळे कालची निवडणूक झाली नाही. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर सत्तार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांना शिवसेनेत पाठविले. सत्तारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवबंध हातात बांधले. त्यानंतर शिवसेनेची सत्तास्थापन होईपर्यंत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळातच होते.

मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तासाभरात चित्र बदलले व सत्तार राज्यमंत्रिपद मिळाल्यापासून नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या समर्थकांचा स्वतंत्र गट स्थापन केला व ते पुन्हा भाजपच्या संपर्कात गेले. भाजपने देखील अध्यक्षपदाचा दावा सोडून देत सत्तार समर्थकासाठी फिल्डींग लावली. त्यामुळे सत्तारांची भाजप जवळीक देखील राजीनाम्याचे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

अर्जुन अस्त्र  फेल
अर्जुन खोतकर यांना अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविले आहे. औरंगाबाद येथील एका हॉटेलात या दोघांची भेट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न तेव्हा कॉंग्रेसमध्ये असलेल्या अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यामुळे सत्तार आणि खोतकर यांच्यातील ट्युनिंग पाहता उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांचे मन वळविण्याची जबाबदारी खोतकर यांच्यावर सोपवल्याचे बोलले जाते. मात्र सत्तार राजीनाम्यावर ठाम असल्याने अर्जुन अस्त्र फेल गेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com