पंडीत जसराज यांनी स्कूटरने प्रवास करून पाहिल्या होत्या वेरूळ लेण्या! 

मधुकर कांबळे  
Tuesday, 18 August 2020

ख्यातनाम शास्त्रीय गायक, संगीतकार पंडीत जसराज यांचे आणि मराठवाडा विशेषत: औरंगाबादचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते. येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडीत नाथराव नेरळकर यांना पैठणनगरीत त्यांनी तंबोऱ्यावर करायला लावलेली साथसंगत, सुरूवातीच्या काळात पैठणमध्ये पंडीत जसराज यांनी केलेले तबलावादन, त्यांनी स्कूटरवरून वेरूळचा केलेला प्रवास अशा अनेक आठवणींमुळे त्यांचे मराठवाड्याशी अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत.

औरंगाबाद  : ख्यातनाम शास्त्रीय गायक, संगीतकार पंडीत जसराज यांचे आणि मराठवाडा विशेषत: औरंगाबादचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते. येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडीत नाथराव नेरळकर यांना पैठणनगरीत त्यांनी तंबोऱ्यावर करायला लावलेली साथसंगत, सुरूवातीच्या काळात पैठणमध्ये पंडीत जसराज यांनी केलेले तबलावादन, त्यांनी स्कूटरवरून वेरूळचा केलेला प्रवास अशा अनेक आठवणींमुळे त्यांचे मराठवाड्याशी अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यांच्या निधनाने औरंगाबादमधील संगीतप्रेमींचा कंठ दाटून आला. मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पंडीत जसराज यांच्या निधनाबद्दल येथील संगीतक्षेत्रात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. 

साथसंगत करण्याचा केला आग्रह : पंडीत नेरळकर 

पंडीत नाथराव नेरळकर पंडीतजींच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, की लहानपणापासून मराठवाड्याशी त्यांचे नाते आहे. त्यांचे औरंगाबादसह मराठवाड्यात अनेकदा जाणे-येणे होते. माझ्या घरी ते बऱ्याचदा आले होते. पैठणमध्ये साधारणत: १९८३-८४ मध्ये पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचे वंशज गोसावी बंधूंनी त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मला आग्रह करून तंबोऱ्यावर साथसंगत करायला लावली. नंतर त्यांनीच त्या मैफलीत मुड लागत नव्हता, तुम्ही साथसंगत केल्यानंतर मुड लागला, असे मला सांगीतले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पुण्यामध्ये प्रसिद्ध हार्मोनियमवादक अप्पा जळगावकर यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित मैफलीत माझे गायन होते. त्यावेळी त्यांना मी यमन रागात गायलेली बंदीश खूप आवडली त्यांनी तिला खूप दाद दिली. त्यानंतर मी पुन्हा बिहाग रागामधली बंदीश गायली तीचे तर त्यांनी मनापासून कौतुक केले होते. औरंगाबादमध्ये सरस्वती भुवन कॉलेजमध्ये त्यांचे गायन होते. त्यांच्या गायनापूर्वीच व्यासपीठावर साहित्यिक, समीक्षक नरहर कुरूंदकर यांचे निधन झाले. त्यामुळे कुरूंदकरांना श्रद्धांजलीपर थोडेसे गायन केले आणि कार्यक्रम संपवला. खूप मोठ्या मनाचा, खूप उंचीचा गायक त्यांच्या रूपाने आपल्यातून गेला आहे. 

प्रेमळ मन, वैशिष्ट्यपूर्ण गायकी 

डॉ. भवान महाजन कुटुंबीयांशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. ते म्हणाले, की माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांचे आमच्या पैठणमधील घरी येणे जाणे होते. माझ्या बहिणीचे यजमान गोपाळराव देशपांडे यांच्याशी त्यांची खूप गट्टी जमली यामुळे ते बीडलादेखील नेहमी जायचे. ते आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मी संगीत शिकलो नसलो तरी संगीत रसिक आहे, त्यांच्या गायनात आलापी, तानाच नसायच्या तर त्यांचे गायन वैशिष्ट्यपूर्ण होते. फार मोठ्या मनाचे, प्रेमळ स्वभावाचे ते होते. १९६४-६५ मध्ये मी वैद्यकीय शिक्षण घेत असताना ते घरी सपत्नीक आले होते. तेंव्हा त्यांना वेरूळच्या लेण्या पाहयच्या होत्या. त्यावेळी दोन दुचाकीवर त्या दोघांना आम्ही घेऊन गेलो. त्यावेळी पंडीतजी माझ्या मागे स्कूटरवर बसून आले. त्यांना आपण एवढे मोठे गायक आहोत याचा कधी अभिमान वाटला नाही, इतके ते साधेपणाने वागत. 

मोठे भाऊ : डॉ. छाया महाजन 

पंडीतजी आमच्या घरातील सदस्यच होते. माझ्या मोठ्या दिरासारखे होते. आमच्या प्रत्येक कौटुंबीक कार्यक्रमाला त्यांची आवर्जून हजेरी असायची. माझे सासरे तात्यासाहेब महाजन यांचे तर त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते, ते आम्हाला सांगत पंडीत जसराजजी ९-१० वर्षाचे होते त्यावेळी त्यांचे मोठे बंधू मणिराम यांच्यासोबत ते आमच्या पैठणच्या घरी दोन दिवस थांबले होते. त्यावेळी मैफलीत त्यांनी तबलावादन केल्याचे माझ्या सासऱ्यांकडून ऐकले. 

उत्तुंग व्यक्तिमत्व : राम विधाते राम विधाते म्हणाले, की पंडित जसराज यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतात न भरुन निघणारी अशी पोकळी निर्माण झाली. उत्तुंग व्यक्तिमत्व, अत्यंत सात्विक कंठ लाभलेले गायक, सात्विक स्वभावाचे, शिष्यांवर आईप्रमाणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व असलेले पंडीत जसराज यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीताची फार मोठी हानी झाली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Pandit Jasraj Travels On Scooter Aurangabad News