धक्कादायक : 'ती' घरातच बसून, मग कोरोना झाला कसा?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

हिस्ट्रीही सापडेना ः सिडको एन-चारसह नव्या पाच भागांत संसर्ग 

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाली असली तर रोज नवनव्या भागात रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाचे टेन्शन कायम आहे. शनिवारी (ता.२३) बजरंग चौक, सिडको एन-चार गणेशनगर, पहाडसिंगपुरा, एमजीएम परिसर आणि मेहमुदपुरा या भागांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. घरातच बसून असलेल्या एका महिलेला बाधा
कशी झाली? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला असून, अन्य काहींची हिस्ट्री सापडत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रुग्णसंख्या कमी; पण वाढताहेत नवे भाग  शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या १२४३ वर गेली आहे. त्यातील ५७० बाधित घरी परतले. दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी-कमी होत आहे. मात्र आज पुन्हा पाच नवीन भागात बाधित रुग्ण आढळून आले. पहाडसिंगपुरा भागात महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला; मात्र या महिलेला कोरोनाची लागण कुठून झाली हे कळायला तयार नाही. कारण आजपर्यंत ही महिला घराबाहेर पडलेली नाही. एमजीएम भागात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या व्यक्तीची हिस्ट्री मिळालेली नाही. ही व्यक्ती नेमक्या कोणाच्या संपर्कात आली याचा शोध घेतला जात आहे. गणेशनगर आणि महेमुदपुरा भागातही बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी या वसाहतीच्या सीमा सील करून जंतुनाशकाची फवारणी करून घेतली. महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून या भागाचे सर्वेक्षण करून नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. 

घाबरू नका - तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार 
 
आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान 
‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ या अभियानानंतर महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे घोषवाक्य घेऊन मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप शनिवारपासून (ता. २३) नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, मोबाईल फोनमध्ये अॅप डाऊनलोड करून त्यात आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास अवघ्या पाच मिनिटांत संबंधित व्यक्ती कोरोना संशयित आहे की नाही याची पडताळणी होते, असा दावा करण्यात आला आहे. महापालिकेने तयार केलेला राज्यात अशा प्रकारचा पहिलाच अॅप असल्याचेही सांगण्यात आले. 

मानलं बुवा - शिक्षण बारावी, हाताखाली वीस इंजिनिअर अन् टर्न ओव्हर... 

आरोग्याच्या दृष्टीने अॅप तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतल्यानंतर श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. नागेश डोंगरे यांच्या मदतीने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ (MHMH- Mazi Health Mazya Hati) हे हेल्थ अॅप तयार करण्यात आले. अॅपबद्दल प्रा. डोंगरे म्हणाले, की अॅपमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी, सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह, किडनीविकार याबद्दलची माहिती भरल्यावर काही मिनिटांत तुमचा झोन ठरवला जातो. ग्रीन झोन (सुरक्षित झोन), ऑरेंज झोन (अंडर ऑब्झर्व्हेशन) आणि रेड झोन (बाधित) अशा तीन झोनमध्ये तुम्हाला माहिती मिळते. 
 
वॉररूममध्ये डेटा जमा 
हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध असून, एखाद्याने माहिती भरल्यास त्यांचा डेटा महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या वॉररूममध्ये जमा होईल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची माहिती महापालिकेकडे संकलित होईल, असे प्रा. डोंगरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman tests positive for COVID-19 at Aurangabad