शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीचे काम दोन वर्षानंतरही अपुर्णच

राजेभाऊ मोगल
Saturday, 20 June 2020

महापालिकेतील बहुतांश खिसेभरु सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक निवडुकीमध्ये शिवाजी महाराज यांच्या नावानेच मते मागीतली. निवडुन आल्यानंतर पुतळा उंचीच्या कामाकडे कधी फिरकलेही नाही. तत्कालीन महापौरांनी देखील गोडगोड बोलुन वेळ मारुन नेली. यामुळे कोरोना आटोक्यात आल्यानंतर आंदोलनाची चाचपणी संतप्त मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. 

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेले आहे. शिवरायांचे नाव घेत मतांचा जोगवा मागणाऱ्यांनी वेळेत काम पूर्ण न करीत शिवप्रेमींना झुलवत ठेवले, अशा तीव्र स्वरुपाच्या भावना व्यक्त होत आहेत. हे काम लवकर झाले नाही तर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम १९ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरु झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून हे काम सुरु करण्यात आले. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी हे काम पूर्ण होईल अशी शिवप्रेमींना अपेक्षा होती, पण भूमिपूजन होऊन दोन वर्ष झाली तरी दहा टक्केच काम झाले. गेल्या ३६ वर्षात शहरात ज्या काही सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, आंदोलने झाली त्याची सुरुवात याच क्रांती चौकातूनच झाली आहे.

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक

निवडणुकीत सारेच पक्ष शिवरायांच्या नावाचा वापर करतात. नंतर विसरून जातात. दोन वर्षापूर्वी आम्हाला परवानगी द्या, पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम आम्हीच करतो, अशी मागणी मराठा समाजाने महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यास परवानगी तर दिलीच नाही, उलट वेळेखाऊपणा केला. याच गतीने काम सुरु राहीले तर ते पूर्ण होण्यासाठी पाच वर्ष लागतील.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

दरम्यान, महापालिकेकडून हे काम होणार नसेल तर आम्ही स्व -खर्चाने हे काम करतो, असे म्हणत आमदार सतीश चव्हाण यांनी या कामासाठी त्यांच्या आमदार निधीतून दोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. पण महापालिकेच्या इच्छाशक्तीअभावी हे काम अद्याप होऊ शकलेले नाही. याबाबत जिल्हा बॅंकेचे संचालक अभिजीत देशमुख यांनी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. ३१ जानेवारी २०१९ रोजी शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा. रविंद्र बनसोड यांची निवड करण्यात आली. तेंव्हादेखील महापालिकेला पुतळा उंचीची आठवण करुन देण्यात आली होती.

हेही वाचा : लाॅकडाऊन हटवताना अशी घ्यावी काळजी - डाॅ. अजित भागवत  

जिल्हा महोत्सव समितीनेही मागणी महापालिकेकडे केली होती. या प्रकरणी मनपाचा निषेध व्यक्त करण्यात येणार होता. मात्र, मात्र मनपाकडे पैसे नसल्याच्या कारणास्तव कोणताही कंत्राटदार हे कंत्राट घेण्यासाठी तयार नाही. त्यामुळे महोत्सव समितीने आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या आम्ही पुतळ्याची उंची वाढवितो असे मनपाला सांगितले, तरी देखील मनपाने एनओसी दिली नाही. त्यामुळे येत्या शिवजयंतीला मनपाचा निषेध करण्यात येणार असल्याचे जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी सांगितले होते. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

मराठा संघटना आक्रमक 
महापालिकेतील बहुतांश खिसेभरु सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक निवडुकीमध्ये शिवाजी महाराज यांच्या नावानेच मते मागीतली. निवडुन आल्यानंतर पुतळा उंचीच्या कामाकडे कधी फिरकलेही नाही. तत्कालीन महापौरांनी देखील गोडगोड बोलुन वेळ मारुन नेली. यामुळे कोरोना आटोक्यात आल्यानंतर आंदोलनाची चाचपणी संतप्त मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Work On The Height Of The Statue Of Shivray Is Stalled