Amit Deshmukh
Amit Deshmukh

मतभेद दूर सारा, स्वबळाची तयारी करा, पुढचं पुढे बघू; अमित देशमुखांची काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबाद : काँग्रेस पक्ष हे मोठे घर आहे, या घरात भांड्याला भांडे लागते. त्यामुळे मतभेद आपल्याला दिसतात. परंतु, ते जिवंतपणाचे लक्षण आहे. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद नाहीत, तसे मनभेद नसले पाहिजेत, तरच राज्यात पुन्हा काँग्रेस उभी करता येईल. महापालिकेसाठी स्वबळाची तयारी करा, सर्व ११५ वॉर्डात उमेदवार देता येतील, या पद्धतीने काम करा. यापुढे सर्व बैठका औरंगाबादेतच घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महापालिका निवडणूक तयारीसाठी औरंगाबादेतील मोजक्याच पदाधिकाऱ्यांची मुंबईतील गांधी भवनात जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (ता.१७) बैठक घेतली. तीत स्वबळ आणि आघाडी करून लढण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, आमदार राजेश राठोड, धीरज देशमुख, माजी आमदार एम. एम. शेख, माजी मंत्री अनिल पटेल, प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदिया, मागासवर्गीय विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, नामदेव पवार, भाऊसाहेब जगताप, डॉ. जफर, हमद चाऊस, सुरेखा पानकडे, निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक दादासाहेब मुंडे, माजी महापौर अशोक सायन्ना, इब्राहिम पठाण, महिला अध्यक्षा सीमा थोरात यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


सुरुवातीला शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी महापालिका निवडणुकी विषयी पक्षाची भूमिका विषद केली. जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी शहरात सामाजिक समीकरणाबरोबरच सरकारच्या ध्येयधोरणांची चर्चा अधिक करावी लागेल, असे नमूद केले. अनिल पटेल यांनी संघटित काम केल्यास काँग्रेसला निवडणुकीत यश मिळेल, असे मत व्यक्‍त केले. डॉ. जफर यांनीही आपले मुद्दे मांडले. वेळी काही पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, असे मत व्यक्त केले. तर काहींनी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्यातील निकालांचा दाखला देत महापालिका निवडणुक देखील आघाडी करून एकत्रित लढवावी, असे सुचवले.

समित्या गठीत करणार
पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतल्यानंतर अमित देशमुख यांनी महापालिकेच्या सर्व म्हणजे ११५ वॉर्डात उमेदवार देण्याची तयारी करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पुढे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानूसार रणनिती आखली जाईल. महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा काय असेल, प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाईल, उमेदवारांची निवड, मुलाखती या सगळ्या बाबीसाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com