कामगार, कष्टकऱ्यांशी पंगा घ्याल तर महागात पडेल

राजेभाऊ मोगल
Wednesday, 8 January 2020

मागील काही वर्षापासून सातत्याने संघटीत व असंघटीत क्षेत्रातील व सार्वजनिक क्षेत्रातील कमगार आपले प्रश्‍न केंद्र सरकार समोर मांडत आहेत. मात्र, केंद्र सरकार मध्यवर्ती कामगार संघटनाबरोबर बोलणी करून मार्ग काढत नाही. म्हणून हा एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. 

औरंगाबाद : मूठभर लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सरकारने कामगार, कष्टकऱ्यांचा नाद करू नये, अन्यथा महागात पडेल, अशा इशारा महागाईसह अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारलेल्या आंदोलकांनी दिला आहे.

जवळपास 2200 कारखाने बंद ठेवून दोन लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. 

कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे एकदिवसीय संपाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी (ता. आठ) यानिमित्ताने सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला.

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला. संपूर्ण औद्योगिक बंद, त्याचप्रमाणे कामगार, बांधकाम कामगार, कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि महिला मोठ्या संख्येनी संपात सहभागी झाल्या आहेत.

Aurangabad News

तीस ते चाळीस संघटना सहभागी

संपाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मोर्चात सीटू, आयटक, इंटक, भारतीय कामगार सेना, श्रमिक महासंघ यासह तीस ते चाळीस संघटना सहभागी झाल्या. याबाबत विभागीय आयुक्‍तांमार्फत पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की केंद्र सरकारने कामगारांनी संघर्ष व बलिदानातून मिळविलेले 44 कामगार कायदे रद्द करून केवळ चार कामगार कोडमध्ये परिर्त्तित करण्याचे काम केले आहे.

हेही वाचा

औरंगाबादेत बॅंकांच्या संपामुळे कोट्यावधींचे व्यवहार ठप्प; ही बॅंक मात्र आहे सुरू 

संपाला पाठींबा मात्र, प्रत्यक्ष सहभाग नाही... वाचा कुठे 

देशातील सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांचा 1996 मध्ये केंद्र शासनाने कामगारांसाठी केलेला कायदा गुंडाळण्याचा घाट घातला आहे. हे थांबवावे, अन्यथा, असले प्रकार आम्ही हाणून पाडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. हा मोर्चा विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या परिसरातील दिल्लीगेट येथे पोहचल्यानंतर त्याचे रुपांतर जाहीर सभेत झाले.

मंचावर सीटूचे ऍड. उद्धव भवलकर, सुभाष लोमटे, आयटकचे प्रकाश बन्सोड, इंटचे एम. ए. गफार, भा.क.सेनेचे प्रभाकर मते, मराठवाडा औद्योगिक कामगार संघटनेचे सुभाष पाटील, एचएमएसचे देविदास किर्तीशाही, पॅंथरचे सिद्धांत गाडे, रामकिशन शेळके, अनिल जाभाडे, उमेश कुलकर्णी, रंजन दाणी, जॉन वर्गीस, बी. एल. वानखेडे, संपतराव गायकवाड, संजय महाळंकर, राजेंद्र मुळे, मंगल ठोंबरे, तारा बन्सोडे, दामोदर मानकापे, बसवराज पटने, ऍड. अभय टाकसाळ, दत्तू भांडे, राजु शेरे, नितिन देशमुख, डॉ. देविदास जरारे आदी उपस्थित होते.

दुर्लक्ष होत असल्याने पुकारला संप

मागील काही वर्षापासून सातत्याने संघटीत व असंघटीत क्षेत्रातील व सार्वजनिक क्षेत्रातील कमगार आपले प्रश्‍न केंद्र सरकार समोर मांडत आहेत. मात्र, केंद्र सरकार मध्यवर्ती कामगार संघटनाबरोबर बोलणी करून मार्ग काढत नाही. म्हणून हा एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. 

अशा आहेत काही मागण्या 

  • कामगार विरोधी धोरण रद्द करावे, महागाईवर नियंत्रण आणावे 
  • पेट्रोल, डिझेलवरील राज्य सरकारचे कर कमी करावेत 
  • रोजगारनिर्मितीसाठी ठोस उपाययोजना करून बेरोजगारीवर नियंत्रण आणावे 
  • केंद्र व राज्य सरकारी खात्यातील 24 लाख रिक्त पदे भरावीत 
  • विविध खात्यांतील वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे 
  • सर्व क्षेत्रांतील कामगार, कष्टकऱ्यांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करावे 
  • गरीब, शेतकरी व कष्टकऱ्यांना किमान दहा हजार रुपये मासिक पेन्शन सुरू करावी 
  • केंद्रीय व राज्याच्या सार्वजनिक क्षेत्र उद्योगांमधील निर्गुतंवणूक विक्री, खासगीकरण थांबवा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers Union Strike Aurangabad Maharashtra News Breaking News