युवा अभियंत्याने उभारला पाणी-कचरा विभक्तीकरणाचा प्रकल्प

बाळासाहेब लोणे
रविवार, 22 मार्च 2020

अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्यासामोर देखील प्रकल्पाचे सादरीकरण झाले आहे. पाण्यात वाहून येणारे प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या, कपडे, तुकडे आपोआप विभक्त करणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पामुळे विविध आजारांसाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया, व्हायरस यांना आळा बसणार आहे. 

गंगापूर : शहरांमधून वाहणाऱ्या नाल्यांमुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचतो. तसेच या नाल्यांची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विविध आजार जडण्याची शक्यता असते. यावर एका युवा संशोधकाने उपाय शोधलाय. 

गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील या तरुण अभियंत्याने शहरी नाल्यांतील पाणी व कचरा विभक्त करणारा प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प राज्याला आदर्शवत ठरणार असून, स्वच्छ भारत अभियानाला बळ देणारा ठरणार आहे. प्रभाकर शिवाजी कराळे असे त्याचे नाव आहे. 

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

प्रभाकर हे मूळचे टाकळी सागज (ता. गंगापूर) येथून शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कनकसागज येथील जिल्हा परिषदेच्या, तर माध्यमिक शिक्षण पालखेड (ता. वैजापूर) येथील पारवेश्वर विद्यालयात झाले. विनायकराव पाटील महाविद्यालयात उच्च माध्यमिकचे शिक्षण घेऊन त्यांनी पुणे विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स शाखेत अभियांत्रिकीची पदवी घेतली. 

असे आहेत फायदे 

 • प्रतितास एक टन कचरा विभक्त करण्याची क्षमता 
 • प्लॅस्टिक पिशवी, बॉटल स्वयंचलित विभक्त होणार 
 • मानवविरहित कचरा विभक्तीकरण 
 • कर्मचाऱ्‍यांना साथीचा कोणताही आजार होणार नाही 
 • कमीत कमी वेळेत जास्त काम 
 • विभक्त कचऱ्याची योग्य विल्हेवाटही होणार 

महाविद्यालयात अखेरच्या वर्षात असताना सर्व बँकांसाठी एकच एटीएम बनवून शोधक वृत्तीची चुणूक त्यांनी दाखवून दिली. २०१५ मध्ये शाई संपण्यापूर्वीच अलर्ट करणारा पेन त्यांनी तयार केला. त्याचवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यामार्फत शास्त्रज्ञ डॉ. नगरकर यांची भेट झाली. शास्त्रज्ञ डॉ. नगरकर यांच्या माध्यमातून सुपर कॉम्प्युटरची निर्मिती करणारे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांची भेट घडली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे काम करण्याची ऊर्जा मिळत गेली, असे प्रभाकर सांगतो. 

राज्यात कोरोनाचा पहिला बळी मुंबईत, वाचा सविस्तर

ग्रामीण भागासाठी काहीतरी करावे अशी मनोमन इच्छा ठेवून २०१९ मध्ये अभियंता प्रभाकर यांनी स्वच्छता कामगारांचे श्रम कमी व्हावेत म्हणून गंगापूर शहरात नाल्याचे पाणी व कचरा विभक्त करण्याचा प्रकल्प उभारला. आमदार प्रशांत बंब व नगराध्यक्षा वंदना पाटील यांनी जागेची उपलब्धता करून दिली. अतिशय कमी खर्चातील हा प्रकल्प संपूर्ण राज्याला आदर्श ठरणारा असणार आहे. याविषयीच्या पेटंटचा प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

या प्रकल्पाला शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्यासह पथकाने भेट दिली. अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्यासामोर देखील प्रकल्पाचे सादरीकरण झाले आहे. पाण्यात वाहून येणारे प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या, कपडे, तुकडे आपोआप विभक्त करणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पामुळे विविध आजारांसाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया, व्हायरस यांना आळा बसणार आहे. 

  आम्ही सतत गेल्या दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या व्यथा, त्यांचे परिश्रम बघून हा शहरी नाल्यांतील पाणी व कचरा विभक्त करणाऱ्या प्रकल्पाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेला प्रकल्प भारतातला एकमेव प्रकल्प असा आहे, की कमी खर्चात व कमी वेळेत जास्त कचरा विभक्त करतो. 
  - प्रभाकर कराळे, युवा शास्त्रज्ञ 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Young Engineer Start Up Story Gangapur Aurangabad News