अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

दीपक देशमुख
Wednesday, 23 September 2020

कन्नड तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

चिंचोली लिंबाजी (जि.औरंगाबाद) : वाकी (ता.कन्नड) येथील तरुण शेतकऱ्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने आपल्या शेतमालाचे नुकसान सहन न झाल्याने मंगळवारी (ता.२२) रात्री सावखेडा (ता.सिल्लोड) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सुरेश रावसाहेब जंजाळ (वय ३७) असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की वाकी (ता.कन्नड)येथील कायमचे रहिवासी सुरेश रावसाहेब जंजाळ यांना वाकी येथे गट क्रमांक १५२ मध्ये अवघी ४५ गुंठे जमीन आहे. या जमिनीवर स्वतःच्या कुटुंबाचा गाडा चालवणे जिकिरीचे झाले असताना सावखेडा (ता.सिल्लोड) येथे मामा लक्ष्मण अंबु गोंगे यांची पाच एकर जमीन बटाईने कसायला घेऊन कुटुंबाचा गाडा चालवण्यास सुरवात केली होती, परंतू मागील आठवडाभरापासून सर्वत्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान केले आहे.

शेतातील पाणी शिरले घरात; संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान, अनेक जण झाली बेघर

यात सुरेश जंजाळ यांचेही मोठे नुकसान झाले. शेतातील नुकसान पाहून खचलेल्या सुरेश यांनी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. वाकी येथे आज बुधवारी (ता.२३) दुपारी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिगावचा पूल गेला वाहून
चिंचोली लिंबाजी व नेवपूर पूर्णा मध्यम प्रकल्प परिसरातील करंजखेड भागात मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने पूर्णा नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे नदीलगतच्या शेतातील पिकांना मोठा तडाखा बसला आहे. यात बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासोबत दिगाव (ता.कन्नड) येथील पूर्णा नदीवरील नळकांडी पुलाला भगदाड पडुन खचून वाहून गेल्याने दिगाव ते देऊळगाव आमठाणा या गावांचा संपर्क तुटला आहे.

त्या भावी तलाठ्यांसाठी ही आनंदाची बातमी, चार आठवड्यात भरती प्रक्रिया होणार, ...

सोबतच याच गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या पलीकडे असल्याने त्यांचाही संपर्क तुटल्याने मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या पुलावरून चारचाकी वाहतूक कायमची बंद झाल्याने मोठी पंचायत झाली आहे. पुढे या रस्त्यावरुन कपाशी, आद्रक, मका, ज्वारी, बाजरी आदींची ने-आण कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. या ठिकाणी नवीन पुल व्हावा अशी गावकऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल आहे. येथे आता तरी नवीन व मोठा पुल बांधावा अशी मागणी येथील राजु तुपे, पुंजाराम सुसूंद्रे, संदीप सुसूंद्रे, अनिल सुसूंद्रे, प्रकाश साळवे, कौतिक काकडे, मयुर सुसूंद्रे, किरण पाटील आदींनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Farmer Committed Suicide Due To Damaged Crops