मेंदी रंगली, पण हळद रुसली! सनई चौघड्यांऐवजी ऐकू आले हंबरडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

कादराबाद शिवारातील घटना, एकुलता एक मुलगा गेल्याने धक्का 

आडूळ (जि. औरंगाबाद) - लग्न म्हणजे आयुष्याचा महत्त्वाचा क्षण. एका लग्नामुळे केवळ दोन व्यक्तीचेच नाते जुळते असे नाही तर दोन कुटुंबांच्या नात्याचा सेतू म्हणजे लग्न. त्यामुळेच घरातील मुला-मुलीचे लग्न ठरले की सगळेच आनंदी असतात. त्याच्या घरचेही असेच आनंदी होते. पण, त्याच्या मनात काय होते कुणास ठावूक. ऐन हळदीच्या दिवशी त्याने गळफास लावून घेतली. त्यामुळे कुंकू लागण्यापूर्वीच हळद रुसल्याची प्रचिती आली. ज्या घरात आनंद होता त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना शनिवारी (ता. २३) सकाळी पिंपळगाव पांढरी (ता. औरंगाबाद) येथे घडली. अजय सुधाकर चोरमारे (वय २१) असे मृताचे नाव आहे. 

अजयचे लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. काही दिवसांपासून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. अजयचे वडील सुधाकर चोरमारे यांची कादराबाद शिवारात जमीन असून, ते कुटुंबासह शेतातच राहतात. त्यांचा मुलगा अजय हा शनिवारी सकाळी सहाला कादराबाद बसथांब्यावरून बिस्कीट घेऊन येतो, असे आई-वडिलास सांगून घरातून गेला. कचनेर
फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला गट क्रमांक २६ मध्ये हाकेच्या अंतरावर त्याने आपली दुचाकी लावली. तेथे शेतातील जांभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Image may contain: 1 person, close-up
अजय चोरमारे

  
करीत होता पोलिस भरतीचा सराव 
अजय हा पदवीधर होता. तो पोलिस भरतीचा सराव करीत होता. त्याचे मोजक्या नातेवाइकांत रविवारी (ता. २४) लग्न होणार होते; परंतु हळदीच्या दिवशीच नवरदेव मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या आईने हंबरडा फोडला. सायंकाळी अजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

घाबरू नका - तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार 
 
कारण अस्पष्ट 
आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार लहू थोटे हे करीत आहेत. 
  
मेंदी रंगलेल्या हाताने अश्रू पुसण्याची वेळ 
ज्या मुलीसोबत अजयचे लग्न ठरले होते तिच्याही घरी आनंदाचे वातावरण होते. लग्न अवघ्या एका दिवसावर आल्याने सर्व तयारी झाली होती. पण, आता मेंदी रंगलेल्या हाताने त्या भावी वधूवर अश्रू पुसण्याची वेळ आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Suicides one day before Marriage at Pimpalgaon Pandhari