मराठवाड्यात पावसाचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

पुणे - मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडला. पावसाच्या थैमानामुळे खरीप पीक पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले आहे.

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात नद्यांना पूर आल्याने बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा, माजलगाव, अंबाजोगई तालुक्यांत तलाव फुटले. बीड, लातुरात जनावरे मृत्युमुखी पडली. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने पुरातून १८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. 

पुणे - मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडला. पावसाच्या थैमानामुळे खरीप पीक पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले आहे.

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात नद्यांना पूर आल्याने बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा, माजलगाव, अंबाजोगई तालुक्यांत तलाव फुटले. बीड, लातुरात जनावरे मृत्युमुखी पडली. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने पुरातून १८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. 

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. पालम, गंगाखेड, सोनपेठ, मानवत तालुक्यांतील सोयाबीन, उडीद, कपाशी, तूर आदी पिके वाया गेली आहेत. निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. करपरा, मासोळी मध्यम प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी वाहिले. हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती मांजरा नदीचा वरच्या भागातील पावसामुळे येणारा पूर वगळता पूरस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील देगलूर, बिलोली तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाची हजेरी लागली. मांजरा नदीला पूर आल्याने पांढरेवाडी गावाला पाण्याचा विळखा बसला. सवळा व तेरणा नद्यांच्या संगमानंतर पाणी तुंबून आसपासच्या शेतात घुसल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

लातूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने मांजरा, तेरणा, रेणा नद्यांना पूर आला आहे. अहमदपूर तालुक्यातील मावलगाव येथे पुरात अडकलेल्या दहा जणांना व रेणापूर येथे दोन, सेलू जवळगा येथील सहा जणांना एनडीआरएफच्या जवानांनी वाचविले. जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे १६ गावांतील एक हजार २६५ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर १६ जनावरांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. 

 

खानदेशात पावसाचे सात बळी

जळगाव/धुळे - खानदेशात परतीच्या पावसाने आज सात जणांचा बळी घेतला. वीज अंगावर कोसळून आमळथे, अनवर्दे व चिंचोली येथील तीन शेतकरी व विटनेर येथील मजूर या चौघांचा मृत्यू झाला; तर धुळे जिल्ह्यातील वरखेडे येथील दोन शाळकरी मुले व चिमठाणे येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

धुळे जिल्ह्यात चिमठाणे येथील मयूर चतुर जाधव (वय १७) हा बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. तेथील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तो बुडाला. दुसऱ्या घटनेत वरखेडे येथील विशाल विजय बाविस्कर (वय १३) आणि प्रेम प्रदीप पाटील (वय १२) हे दोघे शाळकरी मुले पांझरा नदीत पोहताना बंधाऱ्याजवळ बुडाले. अमळथे येथील सुनील भीमराव बाविस्कर या तरुणांच्या अंगावर वीज कोसळली. चिंचोली येथील दिनेश पाटील (वय ४०) या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. दिनेश पाटील हे झाडाखाली थांबलेले असताना वीज कोसळली.  त्यात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच दिलीप बाजीराव धनगर (वय ५६, रा. अनवर्दे खुर्द ), बबलू बुलाल्या पावरा (वय ३२, रा. शिरपूर) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला.

 

भिंत अंगावर कोसळून आई-मुलाचा मृत्यू
तुळजापूर - घरांची भिंत अंगावर पडल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी   मध्यरात्री घडली. तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन मंडपाजवळ ही घटना घडली. आराधवाडी भागातील रहिवासी भारती सत्यजित वाघे (वय २५) आणि तिचा मुलगा मल्हार सत्यजित वाघे (वय दोन) हे घरात असताना भिंत कोसळली. दरम्यान,  मंगरूळ येथे एक जण भिंत पडून जखमी झाल्याची माहिती महसूल आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. खैरून सत्तार मुलानी (वय ४५) हे भिंत पडून जखमी झाले आहेत.

 

बीड जिल्ह्यात हाहाकार

बीड - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रविवारीही जोरदार पाऊस सुरू असून, मागच्या २४ तासांत ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पाटोदा व धारूर तालुक्‍यांत झाला. दोन्ही तालुक्‍यांत पावसाने शंभरी ओलांडली. पाटोदा तालुक्‍यात दहा तलाव फुटले असून, जनावरे वाहून गेली आहेत. 

काही दिवस उघडीप दिल्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. पाटोदा तालुक्‍यात बेलेवाडी, जवळवाडी, निरगुडी, रोहतवाडी, बेदरवाघडी, घाटोवाडी या गावांतील प्रत्येकी एक, तर दासखेडमध्ये तीन छोटे तलाव फुटले. दासखेडमध्ये तलावाखालील गोठे व २० ते २२ जनावरे वाहून गेली. बीडमधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पुलावरून १९८९ नंतर प्रथम पाणी वाहिले. शहरातील अनेक भागांत पाणी शिरले. शहरातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील बिंदुसरा नदीवरील पूल कमकुवत असल्याने वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली. पाटोदा तालुक्‍यात पारगाव घुमरा गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला. बीड शहरात बिंदुसरा नदी पूररेषेतील अनेक कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

Web Title: Rain lashed Marathwada