विद्यापीठाचा 319 कोटींचा अर्थसंकल्प दुरुस्तीसह मंजूर

अतुल पाटील
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. 

विद्यापीठाचा वर्ष 2019-2020 चा अर्थसंकल्प अधिसभा सदस्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. वेतन अनुदानप्राप्ती 67.35 कोटी, विकास व स्वतंत्र प्रकल्प योजनांसह इतर अनुदानासाठी 84.77 कोटी रुपये आणि अनुदानाव्यतिरिक्‍त विद्यापीठाच्या विविध स्रोतांतून प्राप्त होणारी रक्‍कम 124.69 कोटी रुपये, अशी एकूण रक्‍कम 276.81 कोटी रुपये आहे. अर्थसंकल्प मात्र 319.23 कोटी रुपयांवर जात आहे. जमा-खर्चाचा विचार केल्यास 42.42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, राज्यपाल नियुक्‍त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे उपस्थित होते. 
 

नाईक अध्यासन पुन्हा विद्यापीठात 
वसंतराव नाईक अध्यासन केंद्र दोन वर्षांपूर्वी देवगाव रंगारी येथे स्थलांतरित करण्यात आले होते. ते परत विद्यापीठात आणावे, असा ठराव प्रमोद राठोड यांनी मांडला. याला पंकज भारसाखळे, सुनील मगरे, अनुराधा चव्हाण, जितेंद्र देहाडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव मंजूर करण्यात आला. हे केंद्र परत आणावे, यासाठी मागणीचा जोर वाढला होता. 
 
रस्ते, बांधकामावर ताशेरे 
शैक्षणिक गुणवत्तेवर कमी आणि रस्ते, बांधकामावर अधिक खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे काम लक्ष्मीकांत शिंदे यांनी केले. विद्यापीठातील विभागांवर होणाऱ्या खर्चाचा ताळेबंदही मांडल्यानंतर कुलगुरूंनी शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. यावेळी स्वयंनिर्वाह कोर्सला 10 ते 12 विद्यार्थी असतील, तरी विद्यापीठाने लक्ष घालून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे मत डॉ. सतीश दांडगे यांनी मांडले. 
 
खासगीकरणाला विरोध 
जलतरण तलाव विद्यापीठ खर्चातून दुरुस्त करण्यात आला आहे. त्यासाठी 40 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र त्यात पाणी सोडले जात नसल्याचे डॉ. सतीश दांडगे यांनी सांगितले. यावर जलतरणच्या होऊ घातलेल्या खासगीकरणावर सुनील मगरे यांनी आक्षेप घेतला. कुलगुरूंनी खासगीकरण होणार नसल्याचा निर्वाळा दिला. 
 
रोजंदारांचा पगार वाढवा 
रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पीएफ प्रश्‍न मार्गी लावावा, यासाठी विजय सुबुकडे, भारत खैरनार, सुनील मगरे यांनी आवाज उठविला. किमान वेतनावर रोजंदारी कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपयांची वाढ द्यावी, अशी मागणी ऍड. संजय काळबांडे यांनी केली. यावर प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे सांगितले. 
 
नामविस्तारदिनाचे कार्यक्रम मोठे घ्या 
विद्यापीठाचा यावर्षी रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिन होता; मात्र विद्यापीठाने मोठा कार्यक्रम आयोजित केला नाही. मोठे कार्यक्रम घ्या, असे सांगण्यात आले. यावेळी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी गीतभीमायन हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले. शिवाय विद्यापीठ गीतभीमायनचे दहा पेटंट घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. 
  
परीक्षा शुल्क कमी करा 
परीक्षा शुल्क 50 टक्‍के कमी करावे, असा मुद्दा ऍड. काळबांडे यांनी मांडला. याला प्रमोद राठोड, सुनील मगरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी मगरे यांनी परीक्षा शुल्कातून 66 कोटी रुपये मिळतात आणि 24 कोटी रुपये खर्च केले जातात. याकडे लक्ष वेधताना पैसे कमविण्यासाठी विद्यापीठाने दुसरे सोर्स बघावेत, असे सांगितले. यावेळी फळबागांचा पर्याय समोर आला. 
 
पाच कोटी प्रश्‍नपत्रिकेसाठी? 
ऑनलाइन प्रश्‍नपत्रिकेसाठी विद्यापीठाने पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावर काहींनी आक्षेप घेतला. यावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिलेली आकडेवारी गोंधळात टाकणारी ठरली. यात उडी घेत डॉ. दांडगे यांनी हा खर्च दोन कोटी रुपयांपर्यंत येऊ शकतो, असे सांगितले. 
 
भारतरत्न जोडण्याची मागणी 
विद्यापीठाचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करावे, याबाबत राज्य शासनाला कळवावे, अशी मागणी बाबासाहेब कोकाटे यांनी केली.  

Web Title:  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University budget