प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिक्षकास 10 वर्ष सक्तमजुरी 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 30 जून 2018

अखेर पगार काढण्याचे काम करणारा शिक्षक किशन येवते हे हडको भागात आपल्या पत्नीसह अंगणात १५ सप्टेंबर २०१२ रोजी गप्पा करत बसले होते. यावेळी राजेश वाघमोडे हा त्यांच्या घरी आला.

नांदेड : पगार का काढत नाही म्हणून एका सहकारी शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिक्षकास जिल्हा न्यायाधीश ए. जी. मोबे यांनी 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. हा निकाल शनिवारी (ता. 30) दुपारी दिला. 

नांदेड तालुक्यातील किवळा येथे असलेल्या गणपतराव मोरे विद्यालयात सहशिक्षक म्हणून आरोपी राजेश नागनाथ वाघमोडे (वय 42) हा कार्यरत होता. याच संस्थेची दुसरी शाळा ही कारेगाव ता. उमरी येथे संत मोतीराम महाराज विद्यालय आहे. या विद्यालयातून दोन्ही शाळेच्या कर्मचाऱ्यांचे पगारबिल जात असत. परंतु राजेश वाघमोडे यांचा पगार झाला नव्हता. यासाठी त्याने अनेक वेळा संस्थाचालक व पगार काढणारा सहकारी यांना भेटून विनंती केली. मात्र पगार काही केल्या निघत नव्हता. 

अखेर पगार काढण्याचे काम करणारा शिक्षक किशन येवते हे हडको भागात आपल्या पत्नीसह अंगणात १५ सप्टेंबर २०१२ रोजी गप्पा करत बसले होते. यावेळी राजेश वाघमोडे हा त्यांच्या घरी आला. दारावरील बेल वाजविताच किशन येवते यांनी दार उघडताच वाघमोडे यांनी हातातील खंजरने डाव्या बरगडीवर जबर वार केला. यात किशन येवते ओरडूनखाली पडले. यावेळी त्यांची पत्नी धावून आली.

आरोपी वाघमोडे याला ढकलून दिले. पतीला अन्य नातेवाईकांच्या मदतीने शासकिय रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी दैवशाला किशन येवते यांच्या फिर्यादीवरुन वाघमोडे याच्याविरूध्द प्राणघातक हल्ला केला म्हणून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तपास फौजदार एच. आर. उनवणे यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. आरोपीविरूध्द सबळ पुरावे पोलिसांनी दिल्याने १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील अमरीकसिंग वासरीकर यांनी काम पाहिले. आरोपी मागील काही वर्षांपासून कारागृहातच बंदीस्त होता. 

Web Title: 10 years of persecution for teacher