लातूर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यांत शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. तसेच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन रविवारी (ता. 7) फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, डॉ. अशोक कुकडे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, 'या योजनेद्वारे 50 कोटी लोकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार केले जात आहेत. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यात लवकरच दीड लाख "वेलनेस सेंटर' सुरू करण्यात येणार आहेत.''
'मराठवाड्यावर टंचाईचे सावट आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत सर्व माहिती हाती येईल. केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे,'' असे फडणवीस म्हणाले.
'राज्यातील एकही व्यक्ती उपचारापासून वंचित राहणार नाही असा संकल्प आम्ही सोडला आहे. त्यातूनच ही अटल महाआरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. यातून गरजूंवर पुणे, मुंबई यांसारख्या ठिकाणच्या मोठ्या रुग्णालयांत तज्ज्ञांकडून मोफत शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत,'' अशी माहिती महाजन यांनी दिली.
|