शंभर टक्के क्षेत्रात पेरणीचे नियोजन

विकास गाढवे
रविवार, 21 मे 2017

मराठवाड्यातील खरीप हंगाम - खत, बियाणे उपलब्धतेसह उत्पादनवाढीसाठी होणार प्रयत्न

मराठवाड्यातील खरीप हंगाम - खत, बियाणे उपलब्धतेसह उत्पादनवाढीसाठी होणार प्रयत्न
लातूर - यंदा वेळेवर व सरासरीएवढा पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने कृषी विभागाने खरीप हंगामाची जोरदार तयारी हाती घेतली आहे. यातूनच मराठवाड्यातील खरिपाच्या शंभर टक्के क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खत, बी, बियाण्यांपासून पीक कर्जाची उपलब्धता, पिकांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न आदींचा विचार झाला आहे. मराठवाड्यात यंदाही सोयाबीन व त्यानंतर कापसाचे क्षेत्र सर्वाधिक राहाणार असले तरी गतवर्षाच्या तुलनेत त्यात थोडी घट होण्याची शक्‍यता आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मिळून खरिपाचे सरासरी 48 लाख अकरा हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रत्यक्षात 49 लाख तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यंदाही वेळेवर व सरासरी पाऊस गृहीत धरून सरासरीहून अधिक 49 लाख चौदा हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. यात सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असला तरी यंदा त्यात थोडी घट होण्याची शक्‍यता आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र दहा लाख 39 हजार हेक्‍टर असले तरी यंदा 16 लाख बारा हजार हेक्‍टरवर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन आहे. मागील वर्षी 17 लाख 66 हजार क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. मराठवाड्यातील सोयाबीननंतरचे दुसरे प्रमुख पीक म्हणून यंदाही कपाशीची लागवड होणार आहे. त्याचे सरासरीचे क्षेत्र सर्वाधिक 17 लाख 17 हजार हेक्‍टर असले तरी गतवर्षी प्रत्यक्षात चौदा लाख 45 हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा त्यातही पुन्हा घट होऊन ती तेरा लाख 74 हजार हेक्‍टवर होण्याची शक्‍यता आहे. सलग तीन वर्षानंतर गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे सोयाबीन व कापसाच्या घटलेल्या क्षेत्राची जागा उसाचे पीक घेणार आहे. मराठवाड्यात उसाचे सरासरी दोन लाख 39 हजार हेक्‍टर क्षेत्र असले तरी मागील वर्षी केवळ एक हजार हेक्‍टरवर उसाची लागवड होती. यंदा एक लाख 45 हजार हेक्‍टरवर उसाची लागवड होण्याची शक्‍यता आहे. तुरीच्या पेरणीतही यंदा घट होण्याचे संकेत आहेत. तर मका, ज्वारी, बाजरी, भात, मूग, उडीद व इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

खते, बियाणे मागणी
खरिपासाठी मराठवाड्यात विविध प्रकारच्या सात लाख आठ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी महाबीजला एक लाख 86 हजार, राष्ट्रीज बीज निगमला 23 हजार तर खासगी कंपन्यांना चार लाख 99 हजार क्विंटलचे आवंटन मंजूर झाले आहे. बियाणे एक जूनपूर्वी उपलब्धतेचे नियोजन आहे. आठ लाख टन खताचा वापर होणार असून नऊ लाख 90 हजार टन आवंटन मंजूर झाले आहे. मार्चअखेर मराठवाड्यात दोन लाख 39 हजार टन खत शिल्लक होते. त्यामुळे विभागात रासायनिक खताची पुरेशी उपलब्धता आहे. यासोबत विद्यापीठाचे तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते व समूहशेतीचा प्रभावी वापर करून पिकांची उत्पादकता वाढवण्याचे नियोजन आहे.

अकरा हजार कोटीचे पीक कर्ज
खरिपासाठी शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंतच शंभर टक्के म्हणजे दहा हजार 966 कोटी पीक कर्जाचे वाटप करण्याचे नियोजन आहे. यात सर्वाधिक सात हजार 376 कोटींचे कर्ज व्यापारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हा बॅंका आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना केवळ वीस टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव नसल्याने यंदा पीक कर्जाचे पुनर्गठन होणार नाही. तरीही एक लाख शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वाटप करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

नियोजनाची ठळक वैशिष्ट्ये
- उन्नत शेती - समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत 25 मे ते आठ जूनदरम्यान रोहिणी पंधरवडा राबवणार
- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दहा हजार हेक्‍टर क्षेत्रावर रेशीम लागवड - उत्पादन व रेशीम समूहाची स्थापना करणार
- जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन विहिरी तसेच ठिबक, तुषार सिंचनातून सात लाख 53 लाख हेक्‍टर संरक्षित सिंचन क्षेत्र
- ऐंशी टक्के खातेदारांना पीक कर्ज वाटप करणार
- मराठवाड्यात 31 हजार 71 शेतकरी गट व 197 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र खत व बियाणे खरेदी तसेच शेतीमाल विक्रीला प्रोत्साहन देणार

Web Title: 100% field plantation management