अकरा महिण्यात 107 शेतकरी आत्महत्या

कृष्णा जोमेगावकर
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

नांदेड : जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा ता. एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यातून सैरभैर झालेला शेतकरी आत्महत्येचे हत्यार उपसत आहे. या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरणही राबविल्या जाते. परंतु हे उपाय तर तोकडे पडताना दिसत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार ३६७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या घटनेमुळे त्यांच्या संसाराचा गाडा अधीकच खोल जात असल्याचे दिसुन येत आहे.

अवकाळी व गारपीटीचा फटका

जिल्ह्यात सतत चार वर्ष शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. यातुनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला खरीप हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. या परिस्थितीत शेतकरी कोलमडून पडल्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात. यामुळे घराचा कणा मोडून जातो. घर उघड्यावर पडते. मुलाबाळांची होरपळ हाेते. यंदाही जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातुन खरीप गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

सतरा वर्षात १३६७ आत्महत्या

जिल्ह्यात २००३ पासून शेतकरी आत्महत्याच्या घटनांचा नोंद आहे. आजपर्यंत एक हजार ३६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा पासुन आत्महत्या सातत्याने होत आहेत. यात अधीक भर पडली ती २०१४, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये. या चार वर्षात तब्बल ६४१ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यानंतर यात फारसा पडला नाही. चालू वर्षातील अकरा महिन्यात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ९८७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटूब मदतीसाठी पात्र ठरली. तर ३७० प्रकरण अपात्र ठरली आहेत.

आत्महत्येनंतर लाखाची मदत

शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडे त्याची नोंद होते. महसुल, पोलिस पंचनामा, यानंतर जिल्हास्तरीय शेतकरी आत्मत्या सहाय समितीमध्ये अशा शेतकरी कुंटूबाला मदत देण्याचा निर्णय होते. सध्या शासनाकडून एक लाख रुपये मदत दिली जाते. यातील तीस हजार रुपये रोख तर सत्तर हजार रुपये मासीक प्राप्ती योजनेत जमा केले जातात. यातून शेतकरी कुंटूबाला दर महिन्याला आर्थीक मदत मिळते. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटूबातील व्यक्तीला उपचार, मुलाचे शिक्षण व लग्नासाठी अर्धी रक्कम एकाचवेळी काढता येते.

चालु वर्षात झालेल्या आत्महत्या

जानेवारी - सात, फेब्रुवारी दहा, मार्च दहा, एप्रील तीन, मे १२, जून ११, जुलै ११, ऑगष्ट १३, सप्टेंबर नऊ, ऑक्टोबर सात व नोव्हेंबर १४.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 107 farmers commit suicide in eleven months