
Beed News: ‘झेडपी’चे ११ विद्यार्थी पाहणार अमेरिकेची ‘नासा’
Beed News: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील ३३ विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने श्रीहरी कोटा येथील स्पेस सेंटर (इस्त्रो) पाहता येणार आहे. तर, यातीलच टॉपर ११ विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने आणि विमानातून थेट अमेरिकेच्या नासा हे संशोधन केंद्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
सोमवारी (ता. १३) उशिरा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या ग्रामीण भागातील गरिबांच्या हुश्शार मुलांची यादी जिल्हा परिषदेने जाहीर केली.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, त्यांना हवाई सफर घडावी आणि संशोधनाच्या निमित्ताने परदेश वारीही करता यावी, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी अगोदर केंद्र स्तरावर, नंतर तालुका स्तरावर आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दलही माहिती मिळाली. या दोन्ही परीक्षांच्या चाळणींतून यशस्वी निवड झालेल्या ११० विद्यार्थ्यांची रविवारी जिल्हा स्तरावर परीक्षा झाली.
या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. १३) मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी जाहीर केला. यामध्ये पाचवी ते आठवीच्या इयत्तेतून निवडलेल्या ३३ विद्यार्थ्यांमध्ये १९ मुले आणि १४ मुलींचा समावेश आहे.
सहावीचे शून्य; आठवीचे सर्वाधिक
श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटर (इस्त्रो) व अमेरिकेतील नासा हे संशोधन केंद्र पाहण्यासाठी सरकारी खर्चाने विद्यार्थी सहल आयोजित करण्यासाठी पाचवी ते आठवीच्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची अगोदर केंद्र, नंतर तालुका व नंतर जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यातून ३३ विद्यार्थी निवडण्यात आले.
सर्वाधिक १७ विद्यार्थी आठवीचे असून यामध्ये नऊ मुले आणि आठ मुलींचा समावेश आहे. तर, सहावीच्या एकही विद्यार्थ्याला या परीक्षेत यश मिळविता आले नाही. पाचवीतून चार मुले आणि तीन मुली असे सात विद्यार्थी पात्र ठरले. तर, सातवीतून सहा मुले आणि तीन मुली अशा नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली.
इस्त्रो पाहणारे विद्यार्थी तालुकानिहाय (कंसात शाळेचे नाव)
अंबाजोगाई : वैभव चंद्रसेन पिसाळ (कुबेफळ), श्रीकृष्ण सोमनाथ चाटे (खापरटोन), नंदीनी गणेश केंद्रे (केंद्रेवाडी).
आष्टी : जयवर्धन इंद्रकुमार झांजे (कडा क्रमांक एक), प्रणव अंबादास झांजे (वाहिरा), श्रेया किशोर कस्तुरे (कडा क्रमांक एक).
बीड : शिवप्रसाद संजय कोकाटे (चौसाळा), अभय भाऊसाहेब वाघमारे (पाली), सृष्टी आदिनाथ पवार (चौसाळा).
धारुर : अंशुमन सूजच दुबे (धारुर), समीर यासीन शेख (हिंगणी), प्रतिक्षा रामभाऊ कोकाटे (कासारी).
गेवराई : प्रतिक विश्वांभर गव्हाणे (दिमाखवाडी), विवेक गणेश पाचर्णे (रसूलाबाद), सानिका संतराम देवकर (दिमाखवाडी).
केज : अजय दगडू शेळके (येवता), नीलेश संजय चाटे (तांबवा), सृष्टी प्रवीण भोसले (नाव्होली).
माजलगाव : विशाल डिगांबर गायके (लऊळ क्रमांक एक), निकीता मुंजाबा वाशिंगे (लऊळ क्रमांक एक), ऋतुजा विलास धनवडे (मंगरुळ क्रमांक एक).
परळी : भाविका धनराज फड (दौंडवाडी), कपिल गोपिनाथ कुंभार (पिंपळगाव), श्रावणी श्रीमंत दहिफळे (सावरगाव).
पाटोदा : सुरेश पृथ्वीराज पवार (जरेवाडी), अक्षरा अशोक पवार (जरेवाडी), समृद्धी समाधान हुंबे (महासांगवी).
शिरुर कासार : युवराज पांडुरंग सानप (खोकरमोहा), अथर्व महादेव देवकर (खोकरमोहा), आराध्या केशव नागरगोजे (मानूर).
वडवणी : पार्थ गोपिनाथ मुंडे (चिंचवण), सुदर्शन रावसाहेब मुंडे (सोन्नाखोटा), प्रगती रामेश्वर करपे (कान्हापूर).
अमेरिकेतील नासा पाहणारे विद्यार्थी
वैभव चंद्रसेन पिसाळ, जयवर्धन इंद्रकुमार झांजे, शिवप्रसाद संजय कोकाटे, अंशुमन सूरज दुबे, प्रतीक विश्वांभर गव्हाणे, अजय दगडू शेळके, विशाल डिगांबर गायके, भाविका धनराज फड, सुरेश पृथ्वीराज पवार, युवराज पांडुरंग सानप, पार्थ गोपीनाथ मुंडे.
भाविका फड एकमेव मुलगी; आठवीच्यांनाही टक्कर
या सहलीच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर एकच प्रश्नपत्रिका होती.
प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या तीन पैकी टॉपर एकाची अशा ११ विद्यार्थ्यांची अमेरिकेच्या नासासाठी निवड झाली. तर, या ११ सह इतर २२ असे ३३ विद्यार्थी इस्त्रो पाहणार आहे. दौंडवाडी (ता. परळी) शाळेतील पाचवीची एकमेव विद्यार्थिनी नासासाठी पात्र ठरली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या अमेरिकेच्या नासा सहलीसाठी पासपोर्ट, व्हिसा या प्रक्रीया देखील एजन्सीमार्फत जिल्हा परिषदच करणार आहे. लवकर यशस्वी सहल पार पडेल.
- वसुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड