COVID-19 : कोरोनाचा बीडला पुन्हा धक्का, दोन बालकांसह आणखी १३ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

बीड शहरातले कोरोना मिटरही पुन्हा सुरु झाले. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता पावणेदोनशेच्या घरात गेला असून उपचार घेणाऱ्यांची संख्याही पन्नाशीपार झाली आहे. 

बीड  : कोरोनाने जिल्ह्याला मंगळवारी (ता. सात) पुन्हा धक्का दिला. परळी, बीड, आष्टी आणि अंबाजोगाई या चार ठिकाणी दोन बालकांसह नवे तेरा 
रुग्ण आढळले. परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचा अधिक समावेश आहे. बीड शहरातले कोरोना मिटरही पुन्हा सुरु झाले. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता पावणेदोनशेच्या घरात गेला असून उपचार घेणाऱ्यांची संख्याही पन्नाशीपार झाली आहे. 

मंगळवारी जिल्ह्यातील बीडचे जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, परळीचे उपजिल्हा रुग्णालय, केजचे उपजिल्हा रुग्णालय, माजलगावचे ग्रामीण रुग्णालय, गेवराईचे उपजिल्हा रुग्णालय, आष्टीचे ग्रामीण रुग्णालय, बीडचे कोविड केअर सेंटर व अंबाजोगाईचे कोविड केअर सेंटर आदी ठिकाणांहून २८८ लोकांचे थ्रोट स्वॅब नमुने घेऊन त्याची तपासणी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत करण्यात आली.

यात २७३ नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह तर १३ नमुन्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दोन नमुने अनिर्णित राहीले. दरम्यान, आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये परळीत २५ च्या आतील तीन पुरुषांसह पन्नाशीच्या पुढील एक पुरुष व स्त्रीचा समावेश आहे. तर, अंबाजोगाईत पुन्हा तीन पुरुषांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर बीड शहरात पुन्हा तीन वृद्धांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. देवीनिमगांव (ता. आष्टी) चार वर्षीय बालक व आठ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा असल्याचे आढळून आले. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!
 
परळीतील बाधा अंबाजोगाईपर्यंत
दरम्यान, परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियातील आठ कर्मचाऱ्यांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यांच्याशी अनेकांचा संपर्क झालेला आहे. आज पुन्हा परळीत नवीन पाच रुग्णांसह अंबाजोगाईतही तिघे आढळले आहेत. अंबाजोगाईचे रुग्णही परळीतील संपर्कातील आहे. दरम्यान, बीडचे थांबलेले कोरोना मिटर पुन्हा सुरु झाले. शहरात आणखी तीन रुग्णांची भर पडली. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  
 

कोरोनाग्रस्त पावणेदोनशेच्या घरात; उपचार घेणारे पन्नाशीपार
दरम्यान, जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर आढळलेल्या जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाग्रस्तांची संख्या पावणेदोनशेच्या घरात पोचली आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून उपचार घेणाऱ्यांची संख्याही पन्नाशीपार झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आदी ठिकाणी उपचार सुरु आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 new cases of COVID-19 in Beed District