संतापजनक : 13 वर्षांच्या मुलीला गर्भधारणा, अनोळखी व्यक्तीचे दुष्कृत्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अंधारात कुणीतरी एका तेरावर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. बावीस आठवड्यांचा गर्भ काढण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्या. आर. जी. अवचट यांनी गर्भ काढण्याचे आदेश तिच्या वडिलांच्या संमतिपत्राआधारे दिले. 

औरंगाबाद - अंधारात कुणीतरी एका तेरावर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. बावीस आठवड्यांचा गर्भ काढण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्या. आर. जी. अवचट यांनी गर्भ काढण्याचे आदेश तिच्या वडिलांच्या संमतिपत्राआधारे दिले. 

नेमके काय आहे प्रकरण
ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबाला दोन मुली व एक मुलगा आहे. संबंधित पती-पत्नी इतरांची शेती कसून आपला उदरनिर्वाह करतात. अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखविण्यात आले. डॉक्‍टरांनी किरकोळ कारण असल्याचे सांगितले. काही दिवसांनी मुलीचे जास्त दुखायला लागले. पोटात वेदना होऊ लागल्या व चमका निघत असल्याचे औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर बावीस आठवड्यांचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले.

डॉक्‍टरांनी सांगितल्यावर मुलीच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच घसरली. काय करावे समजत नव्हते. त्यांनी मुलीला विश्‍वासात घेऊन विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलीने काहीच घडल्याचे आठवत नसल्याचे सांगितले. एके दिवशी रात्रीच्या वेळेस शौचास जाताना अंधाराचा फायदा घेत तोंड दाबून अत्याचार केल्याचे तिने सांगितले. अंधार असल्याने कोण होते हे समजलेच नाही असे पीडित मुलीने सांगितले. 

गर्भपातासाठी विनंती

यानंतर संबंधित कुटुंबीयांनी वकिलाची भेट घेऊन मुलीच्या पोटात वाढत असलेला गर्भ पाडण्यासाठी काय करावे लागेल याची विचारणा केली. वकिलांनी प्रथम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडपीठात गर्भपात करण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली. यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालय यांचा अभिप्राय मागविण्यात आला. डॉक्‍टरांच्या अहवालानंतर अल्पवयीन मुलीचा गर्भ काढण्याचे आदेश खंडपीठाने
दिले. याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. राज देवडे, केंद्रातर्फे ऍड. डी. जी. नागोडे, तर राज्यशासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी बाजू मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13-year-old girl raped