Coronavirus : जालन्याचे जिल्हाधिकारी कार्यालय हादरले

महेश गायकवाड
Monday, 15 June 2020

  •  अधिकाऱ्याच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची बाधा 
  • जिल्ह्यात सोमवारी १४ नवे रुग्ण, सहाजण झाले बरे 

जालना  : आरोग्य विभागाला सोमवारी (ता. १५) १४ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याने खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या बाधितांपैकी सहा रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आतापर्यंत २७७ रुग्ण आढळून आले आहे. सोमवारी पुन्हा १४ संशयित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा २९१ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवीन १४ रुग्णांमध्ये एक रुग्ण हा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य असून, सदर अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेकांच्या संपर्कात आला असण्याची शक्यता आहे.

कोरोना वॅक्सिनसंदर्भात चिनी कंपनीने दिली गूड न्यूज!

त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचीही कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील वाल्मीकनगरमधील एक, राज्य राखीव दलातील चार जवान, दर्गावेस परिसरातील एक, भाग्यनगरमधील २, कादराबादमधील ३, शंकरनगरमधील एक, समर्थनगरमधील एक व अंबड शहरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. बरे होऊन घरी परतलेल्या सहा रुग्णांमध्ये जालना शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील पाच व मोदीखाना परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

जागतिक साथीमुळे आरोग्याचे मोठे संकट
 

५५३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ५५३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ३९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २४, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३८, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३२, पोलिस प्रशिक्षण केंद्रात १९२, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ६, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ३१, पंचकृष्ण मंगल कार्यालयात ११, आयटीआय कॉलेज ५८ व ज्ञानसागर विद्यालयात २२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३८ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ८, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ४ व अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये २३, मंठा डॉ. मॉडेल स्कूलमध्ये ३, तर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात ४, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४ व भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 
 
जालना कोरोना मीटर 

  • एकूण बाधित २९१ 
  • बरे झाले १७१ 
  • उपचार सुरू ११२ 
  • मृत्यू ८ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 new cases in Jalna dest