जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत 14 टॅंकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

जालना - मागील चार वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा पाणीटंचाई गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे; मात्र एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये 14 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

जालना - मागील चार वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा पाणीटंचाई गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे; मात्र एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये 14 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

मागील वर्षी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली होती. त्यानंतर झालेल्या पावसाळ्यामध्ये वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मध्यम आणि लघुप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता कमी प्रमाणात भासत आहे; मात्र एप्रिल महिन्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्‍यातून टॅंकरची मागणी झाली. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्‍यांमध्ये सध्या 14 टॅंकर सुरू आहेत. 

यात सर्वाधिक भोकरदन आणि जाफराबाद तालुक्‍यात प्रत्येकी सात टॅंकर सुरू आहेत. जाफराबाद तालुक्‍यातील माहोरा येथे दोन; तर जानेफळ (पं.), गोपी, भोलोरा, कुंभारी, वडाळा या गावांमध्ये प्रत्येक एक टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. भोकरदन तालुक्‍यातील जानेफळ (गा.) येथे दोन टॅंकरने तर वाकडी, सावखेडा, चोराळा, तळेगाव वाडी, कुकडी येथे प्रत्येक एका टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच बदनापूर तालुक्‍यातील दगडवाडी येथे एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

दरम्यान मे महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये टॅंकरची संख्या वाढण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या उन्हाचा पारा हा चाळिशीपार जाऊन पोचला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवनही अधिक होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: 14 water tanker in three district