चौदाशे विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी

औरंगाबाद - रोजगार मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांनी अशी गर्दी केली होती.
औरंगाबाद - रोजगार मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांनी अशी गर्दी केली होती.

औरंगाबाद - राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत शनिवारी (ता. पाच) पार पडलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात एक हजार ३९८ जणांना प्रत्यक्ष नोकरी हमीपत्र मिळाले असून, ते उद्यापासूनच कंपनीत रुजू होणार असल्याची माहिती भारतीय उद्योग महासंघाचे दयाळ कांगणे यांनी दिली. यात सात हजार २३० जणांनी ऑनलाइन तर दोन हजार आठ जणांनी फोनद्वारे नोंदणी केली होती. शहरातील कलाग्राम येथे हा मेळावा झाला. नोंदणीपैकी एकूण चार हजार ५५२ जण प्रत्यक्ष उपस्थित राहिले.

मेळाव्याचे उद्‌घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे होते. उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उद्योजक राम भोगले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, महापालिकेचे सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, सीआयआयच्या अध्यक्षा मोहिनी केळकर, मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव गवई उपस्थित होते.

संदर्भाची दरी कमी झाली 
एरवी एखाद्या कंपनीत जाण्यासाठी कोणाचा तरी संदर्भ द्यावाच लागतो. मात्र, मेळाव्यादरम्यान प्रत्यक्ष कंपन्यांशी संपर्क होतो आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळते. त्यामुळे मेळाव्यात संदर्भ देण्याची दरी कमी झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

...तर रोखला जाईल जीएसटी परतावा
औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी राज्य सरकार उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देते. सरकारने राबविलेल्या उद्योग धोरणानुसार ८० टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या धोरणाचे पालन होणे आवश्‍यक; मात्र या धोरणाचे पालन होत नसेल तर जीएसटी परतावा रोखला जाईल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला. राज्यात उद्योग क्षेत्रात भरभराट आहे; मात्र मराठी तरुणांना नोकरी नाही. उद्योगाला चालना देताना मराठी तरुणांना प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घेणार असून त्यासाठी सदर मेळावा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com