दीड लाख शेतकऱ्यांना ७४३ कोटींची कर्जमाफी

Farmer
Farmer

बीड - शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांचे ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी दिली.

कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु यातील एक लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार या शेतकऱ्यांचे एकूण ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. गत आठवड्यापर्यंत यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून सहा कोटी रुपयांचे वाटप बाकी होते. मात्र बुधवारपर्यंतच्या (ता. ४) अहवालानुसार कर्जमाफीअंतर्गत माफ करण्यात आलेली सर्व रक्कम वाटप करण्यात आली आहे.

अग्रणी बॅंकेच्या अहवालानुसार जिल्ह्यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून सर्वाधिक ६३ हजार ९७१ शेतकऱ्यांचे ३७७ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यानंतर डीसीसी बॅंकेकडून ५५ हजार ५८ शेतकऱ्यांचे १४३ कोटी ५६ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून २३ हजार ७८ शेतकऱ्यांचे १४० कोटी २९ लाख, बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून ७ हजार २१ शेतकऱ्यांचे ३८ कोटी ६९ लाख, बॅंक ऑफ बडोदाकडून १ हजार ४०१ शेतकऱ्यांचे ९.५८ कोटी, बॅंक ऑफ इंडियाकडून १२२९ शेतकऱ्यांचे ६.९१ कोटी, कॅनरा बॅंकेकडून ३४४ शेतकऱ्यांचे १.८५ कोटी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून १ हजार ६६४ शेतकऱ्यांचे ९ कोटी, देना बॅंकेकडून ४४३ शेतकऱ्यांचे १.८४ कोटी, आयडीबीआय बॅंकेकडून २८७ शेतकऱ्यांचे २.१० कोटी, सिंडीकेट बॅंकेकडून १४२ शेतकऱ्यांचे ९३ लाख, अर्बन बॅंकेकडून २७० शेतकऱ्यांचे २.१२ कोटी तर विजया बॅंकेकडून ४८९ शेतकऱ्यांचे ३.४४ कोटी रुपये इतके कर्ज माफ झाले आहे.

अद्यापही १ लाख २० हजार शेतकरी वंचित
शासनाने ज्यावेळी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन माहिती भरून घेतली, त्यावेळी कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु नोंदणी केलेल्यांपैकी एक लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांचेच कर्ज माफ झाले आहे. अद्यापही नोंदणी केलेल्यांपैकी एक लाख वीस हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत विचारणा केली असता यातील काही शेतकरी कुटुंबातील एकाचेच कर्ज माफ झाले असून दुबार नावे असल्याने त्यांना वगळण्यात आल्याचे तसेच काहींच्या माहितीमध्ये त्रुटी असल्याने ते अपात्र ठरल्याचे सांगितले जाते. परंतु कर्जमाफीसाठी पात्र असतानाही बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ही योजनाच फसली असल्याचीही चर्चा आहे.

कर्जमाफीनंतर मात्र नवीन कर्जपुरवठा रखडला
जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बॅंकांना २ हजार १०० कोटींवर कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तुलनेत आजपर्यंत २१२.६८ कोटींचेच कर्जवाटप झाले असून ९.९३ टक्के असे कर्जवाटपाचे प्रमाण आहे. ३० हजार ६६१ शेतकऱ्यांना हे कर्जवाटप झाले आहे. एकीकडे जिल्ह्यातील दीड लाखावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असले तरी त्या शेतकऱ्यांना शासन नियमानुसार यावर्षीच्या खरिपासाठी नव्याने कर्जपुरवठा होणे गरजेचे होते. परंतु कर्जमाफीच्या किचकट अटींमुळे तसेच काही ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळामुळे तर काही ठिकाणी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीअभावी संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा रखडला आहे. यामुळे कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यातही अडचणी येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com