लोकअदालतीत 11 न्यायालयांत एकूण 1691 प्रकरणे निकाली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

बीड - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने जिल्ह्यातील 11 न्यायालयांमध्ये शनिवारी (ता.11) राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये 6 हजार 190 दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1691 प्रकरणे निकाली निघाली असून यातून संबंधित पक्षकारांना 18 कोटी 42 लाख रुपयांची भरपाई मिळाली. लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी परिश्रम घेतले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने शनिवारी (ता.11) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या लोकअदालतीत आलेल्या प्रकरणांवर पॅनेल प्रमुखांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. जिल्हा न्यायालयास निकाल लागलेल्या प्रकरणांची माहिती रात्री उशिरापर्यंत देण्याचे काम सुरू होते. दिवाणी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन व नुकसान भरपाईची प्रकरणे, बॅंका व अन्य वित्तीय संस्थाचे नुकसान व वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्‌स ऍक्‍ट, महसुलाबाबतची प्रकरणे व कामगार वाद, वन कायदा व इतर तडजोड पात्र प्रकरणांचा निपटारा यामध्ये करण्यात आला. रेल्वे भूसंपादनाचीदेखील अनेक प्रकरणे या लोकअदालतीत निकाली काढण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे तत्काळ निकाली निघाल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांच्यासह वकील संघाचे अध्यक्ष मंगेश पोकळे यांनी परिश्रम घेतले. 

रेल्वे भूसंपादनाची 89 प्रकरणे निकाली 
शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रेल्वे भूसंपादनाची एकूण 255 प्रकरणे मांडण्यात आली होती. यामध्ये रेल्वे भूसंपादनमधील दरखास्तची म्हणजेच निकालानंतर मावेजाची जवळपास 5 कोटी रकमेची प्रकरणे निकाली काढण्यात आली. याशिवाय रेल्वे भूसंपादनाची एकूण 89 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. जवळपास 10 कोटी रकमेची ही प्रकरणे होती. लोकअदालतीमध्ये रेल्वे भूसंपादनाशी निगडित एकूण 15 कोटींची प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष मंगेश पोकळे यांनी दिली. 

तालुकानिहाय निकाली निघालेली प्रकरणे 

तालुका-घेतलेली प्रकरणे-निकाली प्रकरणे- 
बीड-2549-641- 
अंबाजोगाई-828-200- 
परळी-262-56- 
केज-409-85- 
धारूर-289-87- 
वडवणी-125-27- 
माजलगाव-340-153- 
गेवराई-500-124- 
पाटोदा-120-72- 
आष्टी-383-212- 
शिरूर-340-34- 
एकूण-6190-1691

Web Title: 1691 disposed cases in lokadalat