तिजोरी फोडून मुरूडच्या जिल्हा बॅंकेत १७ लाखाची चोरी

विकास गाढवे
सोमवार, 9 जुलै 2018

लातूर - मुरूड (ता. लातूर) येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत चोरट्यांनी रविवारी (ता. आठ) रात्री चोरी केली. बॅंकेतील तिजोरी गॅसकटरच्या साह्याने तोडून त्यातील १७ लाख 13 हजार रूपये लंपास केले आहेत. चोरीचा घटनाक्रम पहाता चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून घटनेनंतर बॅंकेच्या प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या धाडसी चोरीमुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

लातूर - मुरूड (ता. लातूर) येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत चोरट्यांनी रविवारी (ता. आठ) रात्री चोरी केली. बॅंकेतील तिजोरी गॅसकटरच्या साह्याने तोडून त्यातील १७ लाख 13 हजार रूपये लंपास केले आहेत. चोरीचा घटनाक्रम पहाता चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून घटनेनंतर बॅंकेच्या प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या धाडसी चोरीमुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टीमुळे बंद असलेल्या बॅंकेत रात्री दोन ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी मागील बाजूच्या छोट्या खिडकीतून प्रवेश केला. या खिडकीतून जाण्यासाठी चोरट्यांनी आधीच शिडी तयार करून आणल्याचे दिसत आहे. शिडीवर चढून चोरट्यांनी सुरवातीला खिडकीचे लोखंडी गज गॅस कटरच्या साह्याने तोडून आत प्रवेश गेला. त्यानंतर गॅस सिलेंडर व अन्य साहित्य घेऊन चोरटे आत गेले. त्यांनी आलाराम यंत्रणेची वायर कापली. प्रवेशद्वाराचे शटर आतून बंद केले. त्यानंतर तिजोरीचा कुलूपाचा भाग गॅस कटरच्या साह्याने कापून त्यातील १७ लाख तेरा हजार रूपये लंपास केले. या घटनेत चोरट्यांनी बाजूला असलेल्या लॉकरला हात लावला नाही. रोकड चोरून नेल्यानंतर चोरटे गॅस सिलेंडर, कटर व अन्य साहित्य तिथेच टाकून निघून गेले. सोमवारी (ता. नऊ) सकाळी नेहमीच्या वेळेनुसार बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शटर आतून बंद असल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी शटर तोडून ते उघडल्यानंतर चोरीची घटना उघड झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, संचालक नाथसिंह देशमुख व कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांनी बॅंकेला भेट देऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ठसा तज्ज्ञांसह अन्य तपास यंत्रणांना पाचारण केले असून तपासाला सुरवात केली आहे. खिडकीपासून सिडीची उंची पहाता चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी रेकी केल्याचा तसेच चोरटे सराईत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

चोरांनी केले भोजन
चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बाजूच्या एका किराणा दुकानात असलेल्या वॉचमनसोबत भोजन केल्याची चर्चा आहे. वॉचमनला त्यांनी कामात गुंतवून ठेवल्याचे उपस्थितांनी सांगितले. मात्र, तपास केल्याशिवाय याबाबत खात्रीने सांगता येत नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव यांनी सांगितले. 

दरम्यान बॅंकेपासून थोड्याच अंतरावर असलेल्या भांड्याच्या दुकानात चोरट्यांनी शुक्रवारी (ता. सहा) रात्री चोरी करून तीन लाख दहा हजार रूपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतरही पोलिस सुस्त असल्याचे पाहून चोरट्यांनी बॅंकेत धाडसी चोरी केल्याची भावना ग्रामस्थांत आहे. चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.  

Web Title: 17 lakhs stolen from the district bank latur