सामूहिक विवाह मेळाव्‍यात अठरा जोडपी विवाहबद्ध

संजय कापसे
गुरुवार, 18 मे 2017

आदिवासी समाजाने लग्‍नामध्ये होणारा अनावश्‍यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात आपल्‍या मुलामुलींचे लग्‍न लावण्याची चांगली परंपरा सुरु ठेवली आहे. काही गावातून या विवाह मेळाव्‍याचे अनुकरण करण्यात येत आहे. यामुळे वधुपित्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. इतर समाजानेही सामुहिक विवाह मेळावे आयोजित करणे गरजेचे आहे. - आमदार डॉ.संतोष टारफे, कळमनुरी

कळमनुरी - शंभर टक्‍के आदिवासी लोकसंख्या असलेल्‍या तालुक्‍यातील वाई या गावाच्‍या ग्रामस्‍थांनी मागील चोवीस वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा जोपासत गुरुवारी (ता.१८) झालेल्‍या सामुहिक विवाह मेळाव्‍यात गावातील अठरा युवक युवतींचे लग्‍न लावून आपल्‍या गावाची स्‍वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कळमनुरी शहरानजीक वाई हे सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील बहुतांश ग्रामस्‍थांचा शेती हा व्‍यवसाय आहे. शिक्षणामुळे काही जण आता नोकरी व व्‍यवसायातही स्‍थिरावले आहेत. साधारण तेवीस वर्षापूवी म्हणजे सन १९९४ साली गावातील गंगाधर हनुमंतराव वाईकर, काळूराम धोंडजी साबळे, गंगाराम दगडूजी गुहाडे, हरी मानेजी दुभळकर, किसन सिताराम मुकाडे, गणपत शंकर मुकाडे, मारुती किसन धनवे यांनी एकत्र येत गावातील उपवर  मुलामुलींचे गावातच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करुन त्यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाला मूर्त रुप देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनी सुरुवातीला आपल्‍याच कुटुंबातील उपवर वधु वरांचे लग्‍न ठरवून १९९४ साली पहिल्या सामुहिक विवाह मेळाव्‍याची सुरुवात केली. पहिल्‍याच मेळाव्‍यात पाच लग्‍न लावण्यात आली. तेव्‍हापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. दरवर्षी मे महिन्‍यात सामुहिक विवाह मेळाव्‍याचे आयोजन करुन विवाह लावले जातात. यामध्ये प्रत्‍येक विवाह मेळाव्‍यात आतापर्यंत पाच ते एकोणीस विवाह लावण्यात आले आहेत. या वर्षीही एकाच वेळी अठरा विवाह लावण्यात आले आहेत.

सामुहिक विवाह मेळावा घेण्यासाठी गावकरी मंडळी दोन महिने आधी मे महिन्‍यातील तारीख निश्‍चित करतात. त्‍यानंतर विवाह मेळाव्‍यात लग्‍न लावण्यासाठी उपवर वधु वरांच्‍या कुटुंबीयांकडून सोयरीक व इतर सोपस्‍कार पूर्ण केले जातात. वधुवरांचे पालक सोयरीक झाल्‍यानंतर गावातील मंडळींना याची माहिती देतात.

त्‍यानंतर गावातील सामुहिक आदिवासी विवाह मेळावा मंडळ वाई यांच्‍याकडून विवाह मेळाव्‍यात लावण्यात येणाऱ्या वधु व वरांची माहिती संकलीत करतात. लग्‍नासाठी लागणारे कपडे व दागिने वधु वरांचे पालक ठरवून करतात. विवाह मेळाव्‍यासाठी लागणारा मंडप, बँड, भोजनासह इतर काही गोष्टीसाठी लागणारा खर्च ग्रामस्‍थांच्‍या पुढाकारातून करण्यात येतो. 

मागील चोवीस वर्षांपासून गावातील जेष्ठ नागरिकांनी सुरु केलेली ही सामुहिक विवाह मेळाव्‍याची धुरा आता युवकांनी आपल्‍या खांद्यावर घेतली आहे. गुरुवारी (ता.१८) झालेल्‍या सामुहिक विवाह मेळाव्‍यात गावातील १८ उपवर वधू वरांचे विवाह या मेळाव्‍यात लावण्यात आले. विवाह मेळाव्‍यात लग्‍न लावल्यानंतर उर्वरित सोपस्‍कार वधुच्‍या घरी करण्यात येतात. 

विवाह मेळाव्‍यासाठी चाफनाथ, पिंपळदरी, सालवाडी, मोरवड, पेठ वडगाव, मोरगव्‍हाण, चिंचोर्डी, टव्‍हा, जामगव्‍हाण, घोळवा या गावांसह इतर आठ गावातील वरांकडील वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.     या मेळाव्‍यासाठी आमदार डॉ.संतोष टारफे, अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे उपाध्यक्ष गंगाधर वाईकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य डॉ.सतिष पाचपुते, अजित मगर यांच्‍यासह हजारो वऱ्हाडी यांची उपस्‍थिती होती.

या विवाह मेळाव्‍यात लग्‍न लागल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्‍या सर्व वऱ्हाडी मंडळींची भोजन व्‍यवस्‍था लग्‍न मंडपातच केली जाते. मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी उपस्‍थित असूनही कोठेही गडबड व गैरसोय होत नाही. या वऱ्हाडी मंडळीना सर्व सुविधा मिळाव्‍यात यासाठी गावातील युवक मंडळी पुढाकार घेतात. 

आदिवासी समाजाने लग्‍नामध्ये होणारा अनावश्‍यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात आपल्‍या मुलामुलींचे लग्‍न लावण्याची चांगली परंपरा सुरु ठेवली आहे. काही गावातून या विवाह मेळाव्‍याचे अनुकरण करण्यात येत आहे. यामुळे वधुपित्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. इतर समाजानेही सामुहिक विवाह मेळावे आयोजित करणे गरजेचे आहे. - आमदार डॉ.संतोष टारफे, कळमनुरी.

जेष्ठ नागरिकांनी आदिवासी गावातून सुरु केलेली सामुहिक विवाह मेळाव्‍याची परंपरा पुढे नेण्यासाठी गावातील युवकानी पुढाकार घेतला आहे.  समाजात अनेक ठिकाणी अशा मेळाव्‍याचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - डॉ. सतीश पाचपुते, जिल्‍हा परिषद सदस्‍य, हिंगोली.

Web Title: 18 couples get married in kalamnuri