माजलगाव धरणात 18 टक्के उपयुक्त पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

माजलगाव  - तालुक्‍यात परतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे माजलगाव धरण शंभर टक्के भरले. उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तने होणार असून, यातील दोन आवर्तने झाली असून मंगळवारपासून (ता. 15) तिसरे आवर्तन होणार असल्याने उन्हाळी पिकांना दिलासा मिळणार आहे. सध्या माजलगाव धरणात 18 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 

माजलगाव धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी या धरणाच्या पाणीपातळीचे नियोजन करत मोठ्या प्रमाणावर कापूस पीक मोडून उसाची लागवड केली. माजलगाव धरणातून माजलगाव शहर, अकरा खेडी, परळी थर्मल; तसेच बीड शहराला पाणीपुरवठा केला जातो. पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून, उपलब्ध पाण्याचे नियोजन करत रब्बी हंगामासाठी चार पाणी आवर्तने देण्यात आली होती, तर उन्हाळी हंगामासाठी देखील केलेल्या नियोजनानुसार दोन आवर्तने देण्यात आली असून, तिसरे आवर्तन मंगळवारपासून देण्यात येणार आहे. वाढत्या तापमानामुळे पिके करपून जात आहेत, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तिसऱ्या आवर्तनामुळे पिकांना दिलासा मिळणार आहे, तर काही प्रमाणात का होईना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सिंधफणा नदीपात्रात पाणी सोडावे अशी देखील मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

माजलगाव धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा. सिंचनासाठी तिसरे आवर्तन मंगळवारपासून देण्यात येणार आहे. 
-राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता, माजलगाव. 

धरणाची सद्यःस्थिती 
पाणीपातळी - 427.57 मीटर 
उपयुक्त पाणीसाठा 18.21 टक्के 

Web Title: 18% useful water storage in the Majalgaon Dam