Vidhan Sabha 2019 : कळमनुरीत भाजपचे बंड शमले

संजय कापसे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंड थोपवण्यास शिवसेनेला यश आले आहे. सोमवारी (ता. ७) भाजपच्‍या दोन्‍ही नेत्‍यांनी अर्ज मागे घेतल्‍याने या ठिकाणी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

भाजप कळमनुरी (हिंगोली) : कळमनुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंड थोपवण्यास शिवसेनेला यश आले आहे. सोमवारी (ता. ७) भाजपच्‍या दोन्‍ही नेत्‍यांनी अर्ज मागे घेतल्‍याने या ठिकाणी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी असून या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय युतीमध्ये शिवसेनेचे संतोष बांगर निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी भाजपचे माजी खासदार शिवाजी माने व माजी आमदार गजानन घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्‍यामुळे मतदारसंघात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघारीच्‍या वेळी माने व घुगे यांनी उमेदवारी मागे घेतली. भाजपच्‍या बंडाचा अडथळा शिवसेनेसाठी दूर झाला आहे. याशिवाय रासपचे विनायक भिसे यांनी देखील अर्ज मागे घेतला आहे.

दरम्‍यान, या ठिकाणी आता काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे, शिवसेनेकडून संतोष बांगर, वंचित आघाडीचे अजित मगर हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्‍यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची चिन्‍हे दिसू लागली आहे. त्‍यामुळे मत विभाजनाचा फटका कोणाला बसणार व कोण विजयी होणार याचे गणित मांडले जावू लागले आहे.

या मुद्यांवर होणार निवडणूक
- कळमनुरी औद्योगिक वसाहतीमधे उद्योग उभारणी करणे
- औंढा तिर्थक्षेत्राचा शेगावच्या धर्तीवर विकास करणे
- औंढ्यात भाविकांसाठी पर्यटक निवास बांधकाम करणे
- तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी मिळवून देणे
- शेतीपंपासाठी २४ तास योग्य दाबाने वीज पुरवठा करणे
- नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलून देणे
- मोरवाडी पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरु करणे
- पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करणे
- आदिवासी गावांच्या विकासासाठी प्रयत्न करणे
- वाडी, तांड्यांवर पाण्याचा प्रश्न व रस्त्याचा प्रश्न कायम
- सिंचन विहीरींच्या कामांना  मान्यता देऊन कामे पूर्ण करणे
- कयाधूनदीवर बंधारे बांधणे
- उर्ध्व पैनगंगा कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक

तीन लाख मतदार निवडणार आमदार
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ३४५ मतदान केंद्र असून या ठिकाणी तीन लाख पाच हजार २०१ मतदार आमदार ठरवणार आहेत. यामध्ये एक लाख ५९ हजार ८३५ पुरुष मतदार तर एक लाख ४५ हजार महिला मतदारांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 candidates of bjp withdraws from kalmanuri