वर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप

अनिलकुमार जमधडे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे. 

औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे. 

टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून वर्धनचे 27 फेब्रुवारी 2017 रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला कारने दौलताबाद घाटात नेऊन त्याचा गळा आवळत खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अभिलाष मोहनपूरकर (रा. टिळकनगर) आणि श्‍याम मगरे (रा. तडगूर, ता. मदनूर, जि. निजामाबाद, ह. मु. टिळकनगर) या दोघांना चोवीस तासात अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने 623 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात 41 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. यामध्ये लहान मुलांनी न्यायालयात न घाबरता साक्ष नोंदवल्या होत्या. न्यायालयात अभियोग पक्षातर्फे नाशिक येथील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद पूर्ण केला. 

तांत्रिक पुरावे ठरले महत्वाचे 
ऍड. मिसर यांनी न्यायालयात घटनाक्रम व सर्व पुराव्यांचे तपशील दिले. चिठ्ठी, मृतदेह व रुमाल यांचे सबळ पुरावे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. विशेषत: घटनाक्रमाची साखळी कशी जुळते हे डीएनए चाचणी, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन या वैज्ञानिक पुराव्यांद्वारे (सायंटिफिक एव्हिडन्स) न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक पुरावे महत्वाचे ठरले. 

अशी आहे शिक्षा 
- भादंवि कलम 302 (खून करणे) प्रमाणे अभिलाष मोहनपुरकर व शाम मगरे या दोघांना अजिवन कारावास व अभिलाषला अडीच लाख दंड तर शामला पाच हजार रुपये दंड 
- भादंवि कलम 364 (अ) (अपहरण करुन खून करणे) दोघांनाही अजिवन कारावास, अभिलाषला अडीच लाख रुपये दंड तर शामला पाच हजार रुपये दंड. 
- कलम 201 प्रमाणे पाच वर्ष सक्तमजूरी अभिलाषला दहा हजार रुपये दंड तर शामला एक हजार रुपये दंड 
- कलम 120 ब नुसार दोघांना तीन वर्ष सक्तमजूरी, अभिलाषला दहा हजार रुपये तर शामला एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. 

Web Title: 2 get life imprisonment for Wardhan Ghode murder