महिनाभरात घटले २१९ टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

पैठण तालुक्‍यात टंचाई कायम
सर्वांत जास्त टॅंकर सिल्लोड तालुक्‍यात कमी झाले असून, तिथे दहा दिवसांपूर्वी सुरू असलेल्या २०० पैकी १०७ टॅंकर कमी झाले आहेत; तर दुसरीकडे पैठण तालुक्‍यात एकही टॅंकर कमी झाले नसून तिथे पूर्ववत १३८ टॅंकर सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद तालुक्‍यात १९४ पैकी ३३, फुलंब्री तालुक्‍यात १२४ पैकी ३८, गंगापूर तालुक्‍यात १८० पैकी ५, सोयगाव तालुक्‍यात १२ पैकी २ टॅंकर कमी झाले आहेत. याउलट कन्नड तालुक्‍यात तीन, तर खुलताबाद तालुक्‍यात एका टॅंकरची वाढ होऊन क्रमश: ९३ व ४९ टॅंकरने दोन्ही तालुक्‍यांत सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी १ हजार १७४ टॅंकर सुरू होते, तर आता पावसामुळे काही प्रमाणात पाणीटंचाई कमी झाल्याने सध्या ९५५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद - पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर जिल्ह्यात महिनाभरात कमीअधिक प्रमाणात झालेल्या पावसाने ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी टॅंकरमागे होणारी धावाधाव कमी केली आहे. जूनअखेरपर्यंत टॅंकरची संख्या कमी झाल्याने टंचाई नियोजन कार्यक्रमाला मुदतवाढ घेण्याची आवश्‍यकता भासणार नसल्याचे सूत्रांनी मत व्यक्‍त केले. महिनाभरात जिल्ह्यात २१९ पाण्याचे टॅंकर कमी झाले आहेत.

गेल्या हंगामात पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्र टंचाईला जिल्ह्याला सामोरे जावे लागले त्या पार्श्‍वभूमीवर पाणीटंचाईची आराखड्यानुसार जूनअखेरपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १६ लाख ६५ हजार ४६२ लोकसंख्येच्या ७७६ गावे आणि २९६ वाड्यांमध्ये एक हजार ११६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा पावसाला सुरवात झाल्यापासून काही मंडळांत अतिवृष्टी, तर काही भागांत साधारण पाऊस झाला. यामुळे बंधाऱ्यांत पाणी आले. काही सिमेंट बंधारेही भरले. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत बऱ्यापैकी पाझरू लागल्याने काही गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्रता कमी झाली. यामुळे २१९ टॅंकर कमी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 219 Water Tanker Less by Rain Start