उमरगा : खिचडीतून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

उमरगा तालुक्यातील प्रकार, सर्वांची प्रकृती उत्तम
उमरगा : खिचडीतून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

उमरगा : माध्यान्न वेळेत खिचडी खाल्ल्याने २३ विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती उत्तम आहे. एक दिवसाच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २३) घडला. सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या पेठसांगवी (ता. उमरगा) येथील प्राथमिक शाळेतील आहेत.

उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर तर सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात पाच विद्यार्थी उपचार घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या पेठसांगवी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आज दुपारी अकराच्या दरम्यान खिचडी देण्यात आली. शाळा बारापर्यंत असल्याने काहींनी डब्यातून खिचडी घरी नेऊन खाल्ली.

घरी नेलेल्या डब्यात पाली सदृश प्राण्याचे अवयव आढळल्याची माहिती काही विद्यार्थी, पालकांनी दिली. काही विद्यार्थ्यांना पोटदुखी सुरू झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असून, त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी रुग्णालयात विद्यार्थ्यांची विचारपूस केली. योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रताप शिंदे, गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब महाबोले, बळिराम सुरवसे, योगेश तपसाळे, प्रदिप मदने उपस्थित होते.

''उन्हाळ्याच्या दिवसांत पालीचे प्रमाण जास्त दिसून येते. या घटनेमध्ये नेमका काय प्रकार घडला, कुणाचा निष्काळजीपणा आहे, हे चौकशीअंती समोर येईल. शालेय पोषण आहार तयार करताना मुख्याध्यापकांनी विशेष काळजी घ्यावी.''

- शिवकुमार बिराजदार, गट शिक्षणाधिकारी

''उपजिल्हा रुग्णालयात अठरा विद्यार्थी उपचार घेत आहेत. त्यांना फारसा त्रास नसला तरी एक दिवस निगराणीखाली ठेवले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत.''

- डॉ. विक्रम आळंगेकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com