आणखी २५ शहर बस येणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शहर बस सेवेचा २३ डिसेंबरला प्रारंभ केला जाणार असून, त्यापूर्वी आणखी २५ बस शहरात दाखल होणार आहेत. या बसची तांत्रिक तपासणी करण्यासाठी महापालिका अधिकारी रवाना झाले आहेत. 

औरंगाबाद - शहर बस सेवेचा २३ डिसेंबरला प्रारंभ केला जाणार असून, त्यापूर्वी आणखी २५ बस शहरात दाखल होणार आहेत. या बसची तांत्रिक तपासणी करण्यासाठी महापालिका अधिकारी रवाना झाले आहेत. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून शंभर बस खरेदी करण्यात येत आहेत. बसची डिझाइन अंतिम झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सात डिसेंबरला कंपनीने पहिली बस शहरात पाठविली. ही बस विविध भागांत फिरवून शहर बस सेवेची प्रसिद्धी केली जात आहे. दरम्यान, २३ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बस सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी शंभर कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजनदेखील केले जाणार आहे. दरम्यान, कंपनीने २३ डिसेंबरपर्यंत आणखी २५ बस पाठविण्याची तयारी केली आहे. त्यापूर्वी बसची तांत्रिक तपासणी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी यांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंडित धारवाड (कर्नाटक) रवाना झाले आहेत. 

क्रांती चौकात कार्यालय 
क्रांती चौकातील वॉर्ड कार्यालय महापालिकेने स्थलांतरित केले आहे. त्यामुळे ही जागा शहर बसच्या कार्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा महापालिकेचा विचार आहे. 

बसथांब्यांची दुरुस्ती लांबणीवर 
बस सेवेच्या उद्‌घाटनाची तारीख जवळ येत असली तरी अद्याप बसथांब्यांचे चित्र बदललेले नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमणे असून, काही ठिकाणी पडझड झाली आहे. बसथांब्यांच्या आधुनिकीकरणाचे काम स्मार्ट सिटीच्या एमएसआयच्या निविदेत आहे; मात्र ही निविदा अद्याप अंतिम झालेली नाही.

Web Title: 25 city buses in aurangabad