अभियांत्रिकी परीक्षेचा बट्ट्याबोळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबादेत नगरसेवकाच्या घरी उत्तर पत्रिका लिहिताना 27 विद्यार्थ्यांना अटक

औरंगाबादेत नगरसेवकाच्या घरी उत्तर पत्रिका लिहिताना 27 विद्यार्थ्यांना अटक
औरंगाबाद - अभियांत्रिकी परीक्षेत महागैरव्यवहार उघडकीस आला आहे. पाच ते दहा हजार रुपये द्या अन्‌ खुशाल पुन्हा उत्तर पत्रिका लिहित बसा असाच काहीसा प्रकार औरंगाबादेत शिवसेना नगरसेवकाच्या घरी सुरू होता. नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील घरात हा "उद्योग' सुरू असतानाच गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी (ता. 16) मध्यरात्री छापा टाकून त्यांच्यासह उत्तर पत्रिका पुन्हा लिहिणारे 27 विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकाला अटक केली. विद्यार्थ्यांसह पदाधिकारी शहरापासून नजीकच्या चौका (ता. औरंगाबाद) येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आहेत.

शहरापासून वीस किलोमीटरवर चौका येथे ऍड. गंगाधर मुंढे व त्यांचे भाऊ मंगेश मुंढे यांची साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी ही शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांचा मुलगा किरण शिक्षण घेतो. मंगळवारी (ता. 16) सकाळी दहा ते एक या वेळेत सिव्हील विद्याशाखेचा "बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन' हा पेपर झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका कोऱ्या ठेवल्या होत्या. त्यानंतर हाच पेपर पुन्हा देण्यासाठी काही परीक्षार्थी काल रात्री सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी, हर्सूल भागातील घरी जमल्याची बाब गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, कर्मचारी सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, लालखॉं पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरे यांच्या घरी कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून छापा घातला त्या वेळी 27 विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे उघड झाले.

या सर्व विद्यार्थ्यांसह संस्थाचालक मंगेश नाथराव मुंढे (वय 27, रा. गारखेडा) व प्राध्यापक विजय केशवराव आंधळे (26, रा. सिडको) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 23 उत्तरप्रत्रिका, प्रश्‍नपत्रिका, नोट्‌स, 31 मोबाईल व बत्तीस हजारांची रक्कम जप्त करण्यात आली; तसेच 23 ड्रॉईंग सीट व एक सेंटर रिपोर्ट जप्त करण्यात आला. यानंतर संशयित विद्यार्थी व प्राध्यापकांना गुन्हे शाखेत नेण्यात आले. तेथे सर्वांची कसून चौकशी केली. त्यानंतर संस्थाचालक ऍड. गंगाधर मुंढे, प्राध्यापक संतोष शिवाजीराव देशमुख (32, रा. एन-5, सिडको), अमित माणिक कांबळे (27, रा. एन-5, सिडको) व नगरसेवक सीताराम इसाराम सुरे यांनाही अटक करून त्यांची चौकशी केली. या प्रकरणी सर्वांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

पाच ते दहा हजार देऊन सोडवा पेपर
पेपर पुन्हा सोडविण्यासाठी प्राध्यापकांनी विद्यार्थी हेरले होते. त्यांना पाच ते दहा हजारांची मागणी करून पास करून देण्याची त्यांची तयारी होती. त्यासाठी सीताराम सुरे यांच्याच घरी परीक्षा केंद्र तयार करून पेपर सोडविले जात होते. विशेषत: रात्रीच पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती सुरू होती.

स्ट्रॉंग रूममधील गठ्ठ्याचे सील फोडून...
पोलिसांनी सांगितले, की पेपर संपल्यानंतर गठ्ठा सील करून येथीलच स्ट्रॉंग रूममध्ये ठेवला जात होता. कस्टोडियन व प्राचार्य स्ट्रॉंग रूममधून सील गठ्ठा फोडून पेपर सोडविण्यासाठी देत होते. पेपर सोडविल्यानंतर पुन्हा गठ्ठा सील करून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवला जात होता.

असे घडले नाट्य
- कोऱ्या ठेवलेल्या उत्तर पत्रिका नगरसेवकाच्या घरी आणून पुन्हा सोडविल्या
- उत्तर पत्रिका लिहितानाच पोलिसांचा मध्यरात्री घरावर छापा
- संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापकांचा सहभाग
- 33 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद
- एक पेपर सोडविण्यासाठी घेत होते पाच ते दहा हजार

अटक झालेल्यांची नावे
किरण सीताराम सुरे (24, रा. सुरेवाडी), प्रणव नरहरी पाटील (23, रा. फजल मार्केट, गारखेडा), सौरभ शांताराम कुऱ्हाडे (24, रा. सिडको), रमेश शिवाजी शिंदे (21, रा. मयूर पार्क), केतन विश्‍वास बागल (22, रा. बालाजीनगर, औरंगाबाद), प्रदीप काशिनाथ नामदे (22, रा. मयूर पार्क), सागर सोमनाथ खैरनार (25, रा. पडेगाव, औरंगाबाद), सूरज जयराम काळे (25, रा. हडको, औरंगाबाद), अमोल प्रभाकर मते (25, मयूर पार्क), पुष्कर मुकुंद रत्नपारखी (24, योगेश्‍वरीनगर, जालना), राजेंद्र देवीदास वाहूळकर (25, शिवाजीनगर, औरंगाबाद), दिनेश राजू शिंगारे (24, रा. एकनाथनगर, औरंगाबाद), अतिश अण्णासाहेब थोरात (25, एन-8, सिडको), दीपक श्रीरंग मोहिते (21, रा. बाळापूर, ता. सिल्लोड), शिवराज देवनाथ साळुंके (21, वेदांतनगर, औरंगाबाद), दिलीप केतन साळवे (22, एन-9, सिडको), रामकिसन श्रीहरी मुंढे (23, रा. एन-9, सिडको), मोहम्मद आझाद मोहम्मद नसीर अली (25, दिल्लीगेट, औरंगाबाद), शेख शहबाज शेख अब्दुल (24, क्रांती चौक, औरंगाबाद), विजय रावसाहेब फरकाडे (24, अरुणोदय कॉलनी, एन-6, सिडको), निखिल जनार्दन म्हात्रे (21, रा. डोंबिवली, मुंबई), दिग्विजय सुभाषराव दौंड (21, रा. मोहिनीराजपुरम, हर्सूल, औरंगाबाद), अमोल तेजराव खरात (21, रा. जांभळी जहांगीर, ता. कन्नड), मयूरी श्‍यामराव देशमुख (21, रा. परब, ता. केज, जि. बीड), प्रियांका कारभारी वाहटुळे (21, रा. फुलंब्री, जि. औरंगाबाद), शीतल महादेव बटुळे (21, रा. माधवनगर, ता. पैठण, औरंगाबाद), सचिन सतीश माटवणकर (40, रा. पनवेल, मुंबई) अशी अटकेतील विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Web Title: 25-engineering-students-illegally-writing-paper-corporators-house-25-students-arrested