बिअर शॉपीमधून सव्वीस हजारांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा चोरट्यांनी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता. पैठण) येथील हॉटेल जय भवानीसमोरील अक्षय बिअर शॉपीचे शटर तोडून 26 हजार 546 रुपयांचा माल लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. 18) रात्री घडली.

पाचोड (जि.औरंगाबाद) : पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा चोरट्यांनी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता. पैठण) येथील हॉटेल जय भवानीसमोरील अक्षय बिअर शॉपीचे शटर तोडून 26 हजार 546 रुपयांचा माल लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. 18) रात्री घडली.

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिअर शॉपीचालकाने दैनंदिन कामकाज आटोपून रविवारी (ता. 17) रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. दिवसभर अज्ञात चोरट्यांनी त्यावर पाळत ठेवून मध्यरात्री शटर उचकटून 26 हजार 546 रुपयांची विविध कंपन्यांची दारू चोरून नेली. सकाळी दुकानमालक संतोष वैद्य बिअर शॉपीकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना शॉपीचे शटर तुटलेले व त्यामधील माल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेची माहिती दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेला दिली.

हेही वाचा- वाहनांचे सुटे भाग चाेरणारी टाेळी जेरबंद,दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यानंतर तातडीने गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली व श्वानाच्या साहाय्याने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान जागेवरच घुटमळल्याने सर्व गुलदस्त्यात राहिले. यासंबंधी बिअर शॉपीचे मालक संतोष वैद्य यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहिते करीत आहेत. पंधरवड्यात ही बिअर शॉपी दुसऱ्यांदा फोडून चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

हेही वाचा - मजुराची विहिरी उडी घेऊन आत्महत्या, मुलींच्या लग्नाची हाेती चिंता

दुचाकींच्या धडकेत तरुण ठार

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः पाचोरा-जामनेर रस्त्यावर मालखेडा (ता. पाचोरा) गावाजवळ दोन दुचाकींची धडक होऊन जामनेरचा एक तरुण जागीच ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोनजण सोयगाव शहरातील आहेत.

हेही वाचा - तिबेटीयन स्वेटरची अशी ही नवलाई ः Video

पाचोरा-जामनेर रस्त्यावर मालखेडाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन यात जामनेर येथील राकेश लोणारी हा जागीच ठार झाला आहे. दुसऱ्या दुचाकीवरील विलास राऊत आणि हरीश सोहनी (दोघेही रा. सोयगाव) यांना गंभीर जखमी अवस्थेत पाचोरा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात जखमी झालेल्या अन्य दोनजणांची नावे स्पष्ट झाली नाहीत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 Thousand Rupees Goods Steal From Beer Shoppe Paithan