प्रलयंकारी भूकंपाची 26 वर्षे

विश्वनाथ गुंजोटे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

गावाचे पुनर्वसन ः भूकंपग्रस्तांच्या मूलभूत गरजा सोडविण्यात सरकार अपयशी 

किल्लारी(जि. लातूर) : ता. 30 सप्टेंबर 1993 च्या महाप्रलयंकरी भूकंपाला आज सोमवारी (ता. 30) 26 वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. "त्या' पहाटे तीन वाजून 56 मिनिटाला किल्लारी आणि परिसरातील बावन्न गावांत 6.4 रिश्‍टर स्केलच्या भूकंपाने कोणाची आई, कोणाचे वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण, मुले हिरावली. क्षणार्धात सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं.

शासनाने घरांचे पुनर्वसन केले. मात्र, आज खरी गरज आहे ती या भागातील लोक खरंच भूकंपातून सावरलेत का? त्यांचं मानसिक पुनर्वसन झालेलं आहे का? यात भूकंपग्रस्तांच्या मूलभूत गरजा सुटल्या का? हे पाहण्याची गरज आहे. शासन भूकंपग्रस्तांच्या मूलभूत गरजा सोडविण्यातच पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे आजच्या परिस्थितीतून जाणवत आहे. 

भूकंपाच्या 26 वर्षांनंतरही गावांतर्गत रस्ता मुरूम व मातीचा आहे तोच आहे. पुनर्वसनात शेकडो किलोमीटरचा रस्ता खडक, मुरूम मातीचा बनविलेला होता. त्यावर अद्याप डांबरीकरण झालेले नाही. गावांतर्गत मुख्य रस्तेही मुरूम आणि खडकाचे आहेत. आज त्यावर चालणेही कठीण आहे. 

भूकंपातील तीस खेडी पाणीपुरवठा योजना कायम या ना त्या कारणास्तव विस्कळित राहिली आहे. आजही ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बसस्थानक, तालुक्‍यातील विविध शासकीय उपकार्यालये येथे उपलब्ध व्हावीत. यंत्रणेने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

येथील समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. विविध पक्षांच्या उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद पाहिजे; पण भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कुठलाही ठोस निर्णय मात्र नाही, असे का? असा प्रश्न भूकंपग्रस्त विचारत आहेत. भूकंपग्रस्तांचा शासकीय नोकरीतील अनुशेष भरून काढण्यासाठी ओरड सुरू आहे. या भागातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सुविधा अपुरी असून, त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. भूकंपग्रस्तांना आठव्या आणि नवव्या फेरीतील कबाल्यांचा प्रश्न तसेच नोकरीतील अनुशेष हा प्रमुख मुद्दा आज शासनाने प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 years of catastrophic earthquake